जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात बाभूळगावच्या चार्होळा शिवारात हिंस्त्र प्राण्याने हल्ला केल्याने वृद्ध महिला लंकाबाई सुखलाल राऊत यांचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला होता. परंतु या मृत्युवर काही शंका घेण्यासारखे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. दरम्यान, हा हल्ला नसून हल्ल्याचा बनाव केला असल्याचा दावा वन विभागाच्या अधिकार्याने केलाय. त्यामुळे वृद्ध महिलेचा घातपात कुणी व का केला? केला असा सवाल उपस्थित केला जात आहे.
याबाबत अधिक माहिती देताना वन विभागाच्या अधिकार्यांनी सांगितले की, भोकरदन पोलिसांना शिवारात वृध्द महिलेचे प्रेत दिसून आल्याचे कळवल्यावर वनविभागाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. भोकरदन पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून प्रेत भोकरदन ग्रामीण रुग्णालयात पाठविले होते. वन विभागाच्या अधिकारी व कर्मचार्यांनी घटनास्थळाची पाहाणी केली असता तिथे कुठल्याच प्रकारचे वन्य प्राण्याने हल्ला करून ओरबडल्याचे ओरखाडे दिसून आले नाहीत. त्यावरून हा वन्य प्राण्याच्या हल्ल्याचा प्रकार नसून घातपात असल्याचा संशय अधिकार्यांनी व्यक्त केलाय. वनविभागाच्या अधिकार्यांनी भोकरदनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप जोगदंड यांच्याशी चर्चा करून घटना स्थळाची सखोल तपासणी केली. यावेळी महीलेजवळील काठी रक्ताने भरलेली असून ती विहिरीतील पाण्यात पडलेली आढळली. तसेच घटनास्थळी कोणत्याही वन्य प्राण्याच्या पायाचे ठसे दिसले नाहीत. तर मृत महिलेच्या तोंडात साडीचा कपडा बांधलेला आढळून आलाय. प्रेत कुठून तरी मक्याच्या शेतात आणून टाकल्याचे दिसून येत आहे. त्यावरून हा हल्ल्याचा बनाव करण्यात आल्याचे दिसून येत असल्याचे वन परिक्षेत्र अधिकारी अभिमन्यू खलसे यांनी म्हटले आहे.
घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी श्रीमती पि. पि. पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी अभिमन्यू खलसे, जालना वनपाल सतीश बुरकुले, भोकरदन वनपाल राठोड, वनरक्षक पवार, वनरक्षक जाधव, वनरक्षक पाटील, सिंगारे व त्यांचे पथक घटनास्थळी दाखल होऊन तपास केला आहे.
परिसरात कुठल्याही वन्य प्राण्याचा संचार नाही
परिसरातील शेतकर्यांशी बोलून माहिती घेतली असता, या परिसरात कुठल्याही वन्य प्राण्याचा संचार नसल्याचे शेतकर्यांनी सांगत असल्याचे वन विभागाच्या अधिकार्यांनी म्हटले आहे. त्यामुळे परिसरात कुठल्याही वन्य प्राण्याचा वावर नसताना हल्ला कसा काय झाला असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अधिकच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी हिरकणी अॅप डाऊनलोड करा आणि हिरकणी चॅनलला सब्सक्राईब नक्की करा
https://play.google.com/store/apps/details?id=com.wHirkaniNews_16409978