आयुष्याच्या ताव्यावरती
संसाराची पोळी भाजता भाजता
हाताला किती चटके बसले?
आईने कधी मोजलेच नाही
सा-यांचे करता करता
मोठ्यांचा मान राखण्यासाठी
कितीदा कंबर वाकले?
आईने कधी मोजलेच नाही
बाळाला झोके देता देता
आपली झोप मोडून
बाळासाठी किती रात्र जागले?
आईने कधी मोजलेच नाही
जरा चुकले की सर्वांची बोलणी
गुपचूप वोटीच्या रुपात घेत
काळजाला किती घाव पडले?
आईने कधी मोजलेच नाही
याच्यासाठी, त्याच्यासाठी
आणखीही कुणासाठी जगता जगता
स्वतःसाठी अशी किती जगले?
आईने कधी मोजलेच नाही
पाखरे दूर गेल्यावरती
डोळ्यात महापूर साठवून
प्रतिक्षेचे किती सूर निसटले?
आईने कधी मोजलेच नाही
अनेक पात्र रंगवता रंगवता
सुख दु:खाच्या वजाबाकीत
किती सरले नि किती उरले?
आईने कधी मोजलेच नाही
सुनील शिरपुरे
कमळवेल्ली, यवतमाळ