जालना – भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त जालना येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्याचे सहकार, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते आज संपन्न झाले.
यावेळी आमदार राजेश टोपे, आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड , जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. अक्षय शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उप विभागीय अधिकारी संदीपान सानप आदींसह स्वातंत्र्य सैनिक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, नागरिक, पत्रकार यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री अतुल सावे हे आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणाले की, 15 ऑगस्ट, 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला. या स्वतंत्र देशाची राज्यघटना तयार करण्याचे महान कार्य घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. 26 जानेवारी, 1950 रोजी भारत देश प्रजासत्ताक झाला आणि अंतिम सत्ता प्रजेच्या हाती सोपविण्यात आली. आपला भारत हा एक मोठा लोकशाही देश आहे. ज्या देशाची सर्व सत्ता प्रजेच्या हाती असते, तो देश म्हणजे प्रजासत्ताक होय. भारतीय राज्यघटनेमुळे लोकांना आपले हक्क आणि कर्तव्य यांची जाणीव झाली. भारताचे स्वातंत्र्य अबाधित ठेवणे, भारतीय संविधानाचे पालन करणे ही आपली सर्वांची सामुदायिक जबाबदारी आहे. नागरिकांना त्यांचे मूलभूत हक्क व अधिकार बहाल करुन त्यांच्या व्यक्तीगत सन्मानाचे व जिवीताचे रक्षण करण्याचे अभिवचन संविधानाने भारतीय जनतेस दिले आहे. भारतात जनहितकारी, कल्याणकारी व धर्मनिरपेक्ष राज्यव्यवस्था राबविली जाईल असेही अभिवचन संविधानात देण्यात आले आहे. जगातील सर्वात मोठा सार्वभौम लोकशाही देश म्हणून भारताकडे पाहिले जाते.
आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या जीवाचीही पर्वा केली नाही त्या शूरवीरांना आपण वंदन करूयात. इंग्रजांची जुलमी राजवट संपवण्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांनी केलेला त्याग, देशासाठी आपले सर्वस्व ओवाळून दिलेली प्राणाची आहूती यांचे कायम स्मरण आपणाला राहिले पाहिजे, असे सांगून पालकमंत्री म्हणाले की, आज देशाच्या सीमेवर अनेक सैनिक अहोरात्र मातृभूमीच्या सेवेसाठी सज्ज आहेत. त्यांचा आपण सन्मान करुयात. आपल्या संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही मूल्येही लक्षात ठेवूयात आणि ही मूल्ये आपल्या दैनंदिन जीवनात समाविष्ट करण्याचा प्रयत्न करूयात.
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आवाहन करताना पालकमंत्री पुढे म्हणाले की, जात, धर्म, वंश, लिंग हे सर्व भेदभाव विसरुन एक समानतेने सर्वांना समान संधी मिळवून देण्यासाठी अग्रेसर राहावे. आपल्या देशाच्या समर्थ उभारणीमध्ये युवकांचा मोठा वाटा आहे. इंटरनेट आणि स्मार्ट फोनच्या या आधुनिक युगात आपली युवा पिढी यासाठी अधिक अग्रेसर राहील, अशी अपेक्षा आहे. तुम्ही-आम्ही आपण सर्वजण मिळून प्रयत्न केल्यास सामाजिक जीवनमान उंचावण्याबरोबरच आपल्या देशाला सामर्थ्यशाली महासत्ता बनवू शकतो.
यावेळी पालकमंत्री यांनी परेडचे निरीक्षण केले. परेडमध्ये पोलीस दल, राज्य राखीव पोलीस बल गट, महिला पोलीस दल, श्वानपथक, होमगार्ड पथक, बँडपथक, महिला सुरक्षा दामिनी पथक, दंगल नियंत्रण पथक, एनसीसी, स्काऊट गाइड पथक, अग्नीशामक दलासह विविध विभागाच्या चित्ररथांचा समावेश होता. यावेळी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा पालकमंत्री यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्षानिमित्त कृषी विभागाच्यावतीने विविध तृणधान्यांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या रांगोळीची यावेळी पालकमंत्री यांनी पाहण केली. यावेळी विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर सामुहिक नृत्य सादर केले. सूत्रसंचलन संजय कायंदे यांनी केले.