शेतकर्यांनी स्वदेशी वस्तूचा वापर करुन नैसर्गिक शेती करावी आणि गावाला आदर्श व श्रेष्ठ गाव बणविले पाहिजे असे आवाहन श्री श्री रविशंकर यांनी जालना तालुक्यातील वाटूरफाटा येथील शेतकरी मेळाव्यात केले.
दि. 2 फेब्रुवारी 2023 रोजी श्री श्री रविशंकर यांनी वाटुरफाटा येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात शेतकर्यांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उच्च व शिक्षण तंत्र मंत्री उदय सामंत, माजी मंत्री आ. बबनराव लोणीकर, आ. संजय शिरसाठ, माजी आ. अर्जुनराव खोतकर, माजी आ. सुरेश जेथलिया, आर्ट ऑफ लिव्हींगचे प्रा. डॉ. पुरुषोत्तम वायाळ यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
यावेळी शेतकर्यांना संवाद साधतांना कसे आहात? असे बोलुन त्यांनी भाषणाला सुरुवात केली. त्यांच्या या विचारपुस केलेल्या प्रश्नांना उपस्थितांनी भरभरुन दाद दिली. जलतारा उपक्रम हा जालना जिल्ह्यात सुरु झाला. आणि आता 1 लाखाहून अधिक गावात राबविला जाणार असल्याचे त्यांनी सांगीतले. यावेळी त्यांनी जालना जिल्हा योजनेचं कौतुक केलं. जालन्याची भूमीत काहीतरी चांगले आहे. त्यामुळेच इथे सुरु केलेले उपक्रम देशभरात राबविले जातात, असे सांगून त्यांनी 2010 मध्ये जालना जिल्ह्यात सुरु केलेल्या स्वच्छ भारत अभियानची आठवण करुन दिली. जालना जिल्ह्यात पहिल्यांदा स्वच्छ भारत अभियान सुरु झाले. आणि ते पुर्ण देशभरात राबविण्यात आले. असेच जलतारा या प्रकल्पाचे देखील होईल असेही श्री श्री रविशंकर यांनी म्हटले.
शेतकर्यांनो हसत जा…
शेतकर्यांना शेतीसाठी जलतारा प्रकल्पाच्या माध्यमातून मुबलक पाणी मिळेल. त्यामुळे शेतकर्यांनी आता स्वतःला एकटे समजू नये, आम्ही सोबत आहोत. शेतकर्यांचे टेन्शन आम्ही घेऊ आणि शेतकर्यांना हासु देऊ, आम्ही तुमची समस्या जाणून घेण्यासाठी आलोय. इथून जाताना हसत जा, तरच सत्संगाच महत्व कळेल, असे श्री श्री रविशंकर यांनी म्हटले.
जो धर्माला सोडून सत्तेत जातो, तो जास्त काळ टिकत नाही
जो धर्माला सोडून सत्तेत जातो, तो जास्त काळ टिकत नाही, त्यामुळे धर्माला आणि सिध्दांताला टिकवून ठेवा असा सल्ला राजकारण्यांना श्री श्री रविशंकर यांनी दिलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सामान्य लोकांसाठी काम करतात. त्यांचं अनुकरण सर्वांनी केलं पाहिजे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. यावेळी भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.