जालना :- शून्य ते 18 वर्षांपर्यंतची बालके व किशोरवयीन मुला-मुलींचे सर्वांगीण आरोग्य तपासणी करण्यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने ‘जागरुक पालक सुदृढ बालक’ अभियान दि. 9 फेब्रुवारी 2023 पासून जालना जिल्हयात राबविण्यात येणार आहे. हे अभियान काळजीपूर्वक व जबाबदारीने यशस्वीरित्या राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिले.
‘जागरुक पालक सुदृढ बालक अभियान’ जिल्हयात प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आज आढावा बैठक घेण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री भुसारे, सहा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गजानन म्हस्के, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण विभाग) प्रकल्प अधिकारी (आदिवासी विकास विभाग), तालुका आरोग्य अधिकारी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, महात्मा फुले जन आरोग्य योजनचे जिल्हा समन्वयक उपस्थित होते.
‘जागरुक पालक सुदृढ बालक अभियान’ हे साठ दिवसांचे असणार आहे. या अभियानातंर्गत शासकीय व निमशासकीय शाळा, खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, शासकीय अंगणवाडी, बालगृहे / अनाथालये, खाजगी नर्सरी/बालवाडी, अंध, दिव्यांग शाळा, शाळाबाहय बालके ( शून्य ते 18 वर्षांपर्यंतची बालके), तसेच किशोरवयीन मुला-मुलींची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. ही तपासणी जिल्हयातील शासकीय व निमशासकीय शाळा व कनिष्ठे महाविदयालये, खाजगी शाळा, आश्रमशाळा, अंध शाळा, दिव्यांग शाळा, अंगणवाडया, खाजगी नर्सरी, बालवाडया, बालगृहे, बालसुधार गृहे, अनाथ आश्रम, समाज कल्याण व आदिवासी विभाग वस्तीगृहे, शाळा बाहय मुलांची तपासणी नजीकची शासकीय शाळा, अंगणवाडी या ठिकाणी केली जाणार आहे. साधारण 4 लाख 83 हजार मुला-मुलींची संख्या असून शून्य ते 18 वर्षापर्यंतच्या बालकांची / किशोरवयीन मुला-मुलींची प्राथमिक आरोग्य तपासणी करणे. आजारी आढळलेल्या बालकांवर त्वरित उपचार करणे. गरजू आजारी बालकांना संदर्भ सेवा देऊन उपचार करणे (उदा. औषधोपचार, शस्त्रक्रिया इ.) प्रतिबंधात्मक आरोग्य सुविधा पुरविणे, सुरक्षित व सुदृढ आरोग्यसाठी समूपदेशन करणे, असे अभियानाचे उदिष्ट आहेत. तपासणीसाठी प्रथम, व्दीतीय, तृतीय स्तरनिहाय तपासणी व उपचार पथक तयार करण्यात आले आहेत. पथकात वैद्यकीय अधिकारी, तज्ञ चिकित्सक, आरोग्यसेविक, बहुउद्देशिय कर्मचारी असणार आहेत. या पथकांसोबत स्थानिक आशा व अंगणवाडी सेविका देखील असणार आहेत. सर्व स्तर व तपासणीमध्ये उच्चस्तरीय उपचार व शस्त्रक्रियेची आवश्यकता असलेल्या बालकांवर पुढील उपचार केले जाणार आहेत. प्रत्येक तपासणी पथकामार्फत दिवसाला किमान 150 विद्यार्थ्यांची तपासणी केली जाणार आहे.
या अभियानाचा जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी सविस्तर आढावा घेतल्यानंतर निर्देश देताना ते म्हणाले की, ‘जागरुक पालक सुदृढ बालक अभियान’ हे अतिशय महत्त्वपूर्ण अभियान असून आपल्या जिल्हयातील एकही बालक या अभियानापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. समन्वयाने आणि गांभीर्यपूर्वक हे अभियान यशस्वीरित्या राबवावे.