जालना : पत्रकार आणि वृत्तपत्र वितरण कर्मचार्यांच्या वाहनांसाठी समृध्दी महामार्ग मोफत करण्यात यावा, अशी आग्रही मागणी जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सचिवालय कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना यांच्या हिंदी मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष विकासकुमार बागडी यांनी केली आहे.
या संदर्भात प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात श्री. बागडी यांनी म्हटले आहे की, मुंबई- नागपूर हा समृध्दी मार्ग करण्यात आला हे बरे झाले. परंतू हाच मार्ग आता पत्रकार आणि वृत्तपत्राचे वितरण करणार्या कर्मचार्यांसाठी मोफत करणे गरजेचे झाले आहे. त्याचे कारण देखील तसेच आहे. कारण मुंबई किंवा नागपूरला ये- जा करण्यासाठी हा मार्ग जवळचा असून तो जर का पत्रकार आणि वितरण विभागातील कर्मचार्यांना मोफत करण्यात आला तर त्याचे अनेक फायदे हे पत्रकार आणि वितरण करणार्या कर्मचार्यांना होऊ शकतात, ही बाब सरकारने लक्षात घेतली पाहिजे. तातडीेने आणि जलदगतीने नागपूर किंवा मुंबईला पोहचणे हे जालना जिल्ह्यासह महाराष्ट्रातील पत्रकार आणि वृत्तपत्र वितरण करणार्या कर्मचार्यांना सोपे जाणार आहे. परंतू या महामार्गावर टोलनाके जास्तीचे असून त्याचे पैसेही जास्तप्रमाणात मोजावे लागणार आहेत. ही बाब सामान्य पत्रकार आणि कर्मचार्यांच्या आवाक्याबाहेरची आहे. म्हणूनच सरकारने हा मार्ग पत्रकार आणि वितरण विभागातील कर्मचार्यांसाठी मोफत करायला हवा, अशी विनंतीही हिंदी मराठी पत्रकार संघाचे जालना जिल्हाध्यक्ष श्री. विकासकुमार बागडी यांनी केली असून या निवेदनाच्या प्रती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पा. दानवे, आ. राजेश टोपे, आ. बबनराव लोणीकर, आ. नारायण कुचे, आ. संतोष पा. दानवे, माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, पालकमंत्री अतुल सावे आणि महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा अध्यक्षांना देण्यात आल्या आहेत.