अहमदनगर जिल्ह्यातील लोकहक्क फौंडेशनच्यावतीने लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीरामपूरचे आमदार लहुजी कानडे यांच्या लोकहक्क फौंडेशनच्यावतीने श्रीरामपूर येथील ग्रामीण भागातील साहित्यिक रज्जाक शेख यांना मराठी साहित्यातील अनमोल योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे मा. अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे, श्रीरामपूर विधानसभेचे आमदार लहुजी कानडे, शाहीर संभाजी भगत,विचारवंत डॉ. प्रल्हाद लुलेकर, शमशोद्दीन तांबोळी, जेष्ठनेते इंद्रनाथ थोरात, साहित्यिक डॉ.वंदना मुरकुटे ,ऍडवोकेट समीन बागवान,माऊली प्रतिष्ठाणचे ज्ञानेश्वर मुरकुटे, जेष्ठ नेते अरुण नाईक यांची उपस्थिती होती. गझलकार शेख यांना आकर्षक सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
कोरोना काळात आपल्या उत्तम लेखणीद्वारे राज्यातील विविध वर्तमानपत्रातून आपल्या तीस ते पस्तीस कवितांना प्रकाशित करून आरोग्य व कोरोना यांच्या भयंकरतेची कल्पना मांडली.राज्यातील विविध वृत्तपत्रातून “खेळू करू शिकू” या शासकीय पुस्तकाचे समीक्षण करून लेखाद्वारे सर्व राज्यभर प्रसिद्धी दिली.शाळा बंद शिक्षण सुरू काळात विद्यार्थ्यांना मनोरंजक अशा राज्यभरातून गाजलेल्या नामवंत शंभर कवींच्या बालकविता एकत्र करून सर्व विद्यार्थ्यांना मोफत ‘काव्यदरबार’ हा दिवाळी बालकाव्य विशेषांक उपलब्ध करून दिला आहे. जिल्हा परिषदेच्या अहमदनगर जिल्ह्यातील शाळेच्या बालकवींच्या कविता “काव्यरंग ” या काव्यसंग्रहाच्या संपादकीय मंडळात काम केले आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्यांतर्फे शैक्षणिक कविसंमेलनात दोनदा काव्यसादरीकरणाची संधी मिळाली.भारताचा अमृत महोत्सव अभियानात तालुकास्तरावर देशभक्तीपर गितगायन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.राज्यभरातील विविध वृत्तपत्रांमध्ये आपल्या बालकविता व शेतीमातीच्या जवळपास पंधराशे कविता प्रकाशित केल्या. राज्यभरातील दीडशेपेक्षा जास्त मराठी काव्यसंमेलनात सक्रिय सहभाग घेतला आहे.अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनात चौथ्यांदा शेख यांची निवड होऊन निमंत्रित केले गेले. विविध साहित्य मंचावरुन त्यांना पुरस्कार देवून पुरस्कृत केले गेले. या सर्व कार्याची दखल घेऊन हा महत्वाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.