मुंबईच्या मालाड पूर्वेकडील आप्पापाडा परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपली आई आणि भावासोबत झालेल्या किरकोळ वादातून एका पंधरा वर्षीय मुलाने अचानक पाचव्या मजल्यावरून उडी मारली. जखमी मुलाला ट्रॉमा केअर रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. ही घटना बुधवारी दुपारी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बुधवारी दुपारी साधारपणे दोन वाजण्याच्या सुमारास घडली. मालाड पूर्वेकडील कुरार आप्पा पाडा शिवपार्वती इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून शुभम गुप्ता या पंधरा वर्षीय मुलाने उडी मारली. ज्यावेळी शुभमने उडी मारली त्यावेळी त्याच्यासमोर त्याची आई आणि मोठा भाऊ देखील उपस्थित होता.
बुधवारी सकाळी शुभम उशिरा उठला आणि अंघोळीसाठी स्नानगृहात गेला असता त्याची आई त्याच्या मोठ्या भावाला जवळ घेऊन समजावत होती. आई आपल्यापेक्षा मोठ्या भावालाच अधिक जीव लावते असा समज करून शुभमने आई व भावासोबत वाद घातला असल्याचे समजले आहे.
आपल्यापेक्षा मोठ्या भावाला आई अधिक जीव लावते त्याला सर्वकाही आई-वडिलांकडून मिळते म्हणून शुभम आपल्या आईवर ओरडत होता. त्यामुळे त्यांच्यात नेहमीच वाद व भांडणे होत असतात असे गुप्ता कुटुंबीयांच्या शेजाऱ्यांकडून सांगण्यात आले. कदाचित याच कारणामुळे शुभमने आत्महत्या केली असावी असाही संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र या विषयी कुरार पोलीस अधिक तपास करत आहे.