राज्यातील तापमानात सातत्याने चढ उतार होत आहेत. कधी थंडीचा कडाका तर कधी ढगाळ वातावरण जाणवत आहे. या तापमानातील चढ उताराचा शेती पिकांवर (Agriculture Crop) देखील परिणाम होत असल्याचं चित्र दिसत आहे. दरम्यान, 12,13 आणि 14 फेब्रुवारी दरम्यान राज्यातील किमान तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागानेवर्तवली आहे. यामुळे उत्तर विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव अधिक जाणवण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार जळगाव, औरंगाबाद , जालना आणि नाशिकात तापमान पुन्हा एकदा तापमानात घट होण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यामध्ये एक अंकी तापमान होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा हुडहुडी भरणार असून शेकोट्या पेटणार आहेत. मराठवाड्यातील लातूर आणि नांदेडमध्ये देखील किमान तापमानात मोठी घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मागील काही दिवसात राज्यातील काही भागात थंडीचा जोर काहीसा कमी झाला होता. त्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. आता पुन्हा थंडीत वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
राज्यात सातत्याने तापमानात चढ उतार होत आहे. कधी थंडी तर कधी पाऊस पडत आहे. या हवामानाचा रब्बी हंगामाच्या पिकांवर परिणाम होत आहे. बहुतांश भागात कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. तसेच गहू, हरभरा, मका या पिकांना देखील या वातावरणाचा फटका बसणार असून उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. खरीप हंगामात आधीच अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सगळ्या आशा आता रब्बी हंगामातील पिकांवर आहेत. मात्र, हवामानातील बदलाचा रब्बी पिकांवर परिणाम होत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. काही भागात बदलत्या हवामानाचा केळी पिकावर देखील परिणाम झाला आहे. रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने केळीच्या उत्पादनात देखील घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.