प्रेम ही एक प्रकारची भावना आहे. जी एखादी वस्तू, एखादी व्यक्ती किंवा एखाद्या विशिष्ट गोष्टीविषयी आपल्या मनामध्ये निर्माण होते. तसं पाहायला गेलं तर एका ठराविक वयामध्ये प्रत्येकाला प्रेम हे होतच असते. मग ते वन साईड असो किंवा टू साईड… मग यामध्ये काही लोकांचे प्रेम यशस्वी होतात तर काही लोकांचे होत नाही तो भाग वेगळा. आज हाय एज्युकेटेड, कधी काळी टॉपर असलेल्या आणि कॉम्पिटिटीव्ह एक्झामची तयारी करणा-या मुलीसुद्धा या प्रेमात डोक्यावर पडताना दिसून येतात.
एकाला उज्ज्वल भविष्याचे स्वप्न दाखवून, त्याच्या भावनांशी खेळून दुस-यालाच आपलं सर्वस्व अर्पन करतात. ही ज्याप्रमाणे दुस-याला दगा देत असते, त्याचप्रमाणे सर्वस्व मिळवलेलाही हिला दगा देत असतो. तेव्हा मात्र ही डोक्यावर हात मारत असते की, मी काय करून बसली? जी मुलगी दुस-याचं स्वप्न धुळीस मिळवत असते. ती स्वत:च्या स्वप्नांचे काय दिवे लावतील? हा गहन प्रश्न आहे. आधी या मुली हायफाय स्वप्न रंगवताना दिसून येतात, पण शेवटी खालच्या पोस्टींगच्या प्रयत्नात आपलं लक आजमायला लागतात. विचार करायला लावणारी गोष्ट आहे. जी मुलगी स्वत:च्या स्वप्नांबद्दलच ठाम राहू शकत नाही, ती प्रेमात दिलेल्या वचनांची पूर्तत: काय करेल? अशा मुलींपासून एक जरी संकेत मिळाल्यास तिच्यापासून तात्काळ अलिप्त होणेच योग्य राहील. त्यामुळे कुणावर प्रेम करत असाल तर पुढीलप्रमाणे करावं. अन्यथा प्रेमाचा विचारच मनात आणू नये.
एक मुलगा होता. तो एका मुलीवर स्वत:पेक्षाही जास्त प्रेम करायचा… त्याच्या परिवारातील लोकांनीही त्याला कधी साथ दिली नाही. तरीही तो त्या मुलीवर प्रेम करत राहिला. परंतु मलगी काही पाहू शकत नव्हती. कारण ती आंधळी होती. मुलगी नेहमी मुलाला म्हणायची की, तुम्ही माझ्यावर एवढं प्रेम का करता? मी तुमच्या कोणत्याही कामी येऊ शकत नाही. मी तुम्हाला ते प्रेम देऊ शकत नाही, जे इतर कुणी देऊ शकतात. परंतु तो मुलगा नेहमी तिला धीर देत होता की, तू ठिक होशील. तुच माझं पहिलं प्रेम आहे आणि राहशील. नंतर काही वर्ष हा प्रवास सुरु होता. एक दिवस तो मुलगा पैशाची जुळवाजुळव करून तिचं ऑपरेशन करायला लावतो. ऑपरेशन झाल्यानंतर ती सर्व काही पाहू शकत होती. परंतु तिला कळतं की, मुलगाही आंधळा आहे. तेव्हा मुलगी त्याला म्हणाली की, मी तुमच्याशी प्रेम करू शकत नाही. तुम्ही तर आंधळे आहेत आणि मी कोणत्याही आंधळ्या व्यक्तीला आपला जीवनसाथी म्हणून निवड करू शकत नाही. तुमच्यासोबत माझं कोणतंही भविष्य नाही. तेव्हा मुलगा हसायला लागतो आणि जाऊ लागतो. त्याचे शेवटचे शब्द हे असते की, माझ्या डोळ्यांची काळजी घे…
एक हवाई सुंदरी होती. ती दिसायला तर सुंदर होतीच, पण त्यापेक्षाही सुंदर तिची आपल्या पतीवर प्रेम करण्याची पद्धत होती. जेव्हा जेव्हा ती बाहेरच्या देशात असे, तेव्हा तेव्हा ती रोज एक गुलाबाचे फुल आपल्या पतीला पाठवत असे आणि जाणवून देत असे की, मी कुठेही असले तरी मनाने फक्त तुमच्या जवळच आहे. ती दुसरीकडे असताना तिच्या रोज येणाऱ्या गुलाबाच्या फुलाची सवय तिच्या पतीला झाली होती. पण, कदाचित त्या हवाई सुंदरीचे हे सुंदर प्रेम देवाला ही आवडले असावे म्हणून की काय? देवाने तिला आपल्याकडे बोलावून घेतले. ती ज्या विमानात होती, त्या विमानाचा अपघात झाला आणि बिचारी आपले प्राण गमावून बसली. ही बातमी ऐकून तिचा नवरा एवढा रडला की, तो कधी एवढा रडला नसेल किंवा त्याच्या इतके कुणीही एवढे रडले नसेल. पण इथे तिचे प्रेम संपले नव्हते, ते तर आता सुरु झाले होते. तिच्या दुर्दैवी मृत्यूनंतर देखील रोज त्याला गुलाबाचे फुल मिळत होते. हे बघून तिचा पती आश्चर्य चकीत झाला व या मागाचे कारण शोधण्यासाठी त्याने रोज फुल घेऊन येणा-या मुलास विचारले, “तुला हे फुल नक्की कोण देत. माझी पत्नी मरून १५ दिवस झाले. तरी तू रोज फुल आणून देत आहेस. नक्की प्रकार काय आहे?” मुलगा म्हणतो, साहेब! तुमची पत्नी तुमच्यावर खूप प्रेम करते. तिची विचारशक्ती खूप पुढची होती. म्हणून तिने आधीच विचार करून ठेवला होता की, “जर कधी विमानास अपघात झाला तर माझे जीवन संपेल. पण प्रेमाला कधी संपवायचे नाही आणि या विचाराने तिने मला आधीच भरपूर पैसे देऊन ठेवले आहेत.” जेणे करून आयुष्यभर ती तुम्हाला रोज एक गुलाबाचे फुल देऊ शकेल आणि तिचे नसणे सुद्धा तुम्हाला असण्याची जाणीव करून देईल.
एकदा बस स्टॉपवर खुपच गर्दी होती. बस स्टॉपवर खुपच मोठी लाईन लागली होती. सर्वजन बसची वाट पाहत होते… तेवढ्यात एका मुलाचा एका मुलीला थोडा धक्का लागला. ती चिडली आणि रागाने ओरडली, का रे दिसत नाही का तुला? का डोळे फुटले तुझे..? तो सॉरी म्हणाला तिला, पण तिची बडबड काही केल्या थांबेनाच… मग, तोही चिडला आणि म्हणाला, इतका कसला माज आहे गं तुला.? मग, आहेच मुळी गर्व मला… आहेच मी इतकी सुंदर… एखादी सुंदर मुलगी दिसली की लगेच तुम्ही मुलं घसरता तिच्यावर… असं बोलून तिनं तर त्याच्या स्वाभिमानालाच हात घातला होता… तो म्हणाला, मी म्हटलं तर तुझ्यासारख्या छप्पन पोरी उभ्या करू शकतो. पण, माझा तो मुळ स्वभाव नाही म्हणून गप्प आहे… ती… आला मोठा दीडशहाणा… मी सर्वांपेक्षा वेगळी आहे, मला पटवणं इतकं सोप्प नाही… त्यावर तो… असं म्हणतेस स्वीकारलं मी चॅलेंज… आजपासून बरोबर पंधरा दिवसांच्या आत तू मला आय लव्ह यू म्हणशील आणि तेही इथेच… आजपासून बरोबर पंधराव्या दिवशी… हा माझा विश्वास आहे. असं म्हणून तो तिथून टॅक्सीने निघून गेला. ती मनातल्या मनात म्हणत होती की, मी काही केल्या याला आय लव्ह यू कशी आणि का म्हणेन? छे!छे! वेडा आहे हा…
कॉलेजमध्ये पोहोचल्यावर ते एकमेकांना एकाच वर्गात दिसले. त्याबरोबर दोघांनीही एकमेकांकडे पाहून नाकं मुरडली होती. दोघांचं एकाच वर्गात ॲडमिशन झालं होतं. त्यामुळे ते एकमेकांना पुन्हा पुन्हा दिसू लागले. त्याला पाहिल्यावर तिला त्या दिवसाबद्दल राहून राहून वाईट वाटत होतं. म्हणून तिनं ठरवलं की त्याला सॉरी म्हणावं. मग, क्लासमध्ये तिची भिरभिरती नजर त्याचा शोध घेऊ लागली. पण तो काही दिसला नाही… कदाचित आज तो आला नसेल, असा विचार तिने केला. म्हणून तिने त्याला शोधणं बंद केलं आणि कँटीनच्या दिशेने ती चालू लागली. कँटीनमध्ये प्रवेश केल्याबरोबर तो तिथे कॉफी घेताना दिसला… मग, ती त्याच्या टेबलवर जाऊन बसली… त्याला थोडं आश्चर्यच वाटलं. पण तो शांतपणे कॉफी घेत राहीला. ती आय एम सॉरी… तो थोडा दचकलाच… पण तिने आणखी एकदा आय एम सॉरी म्हटलं… तो म्हणाला व्हॉट अबाऊट? ती म्हणाली की, बस स्टॉपवर जे झालं त्याबद्दल… त्यावर तो म्हणतो इट्स ओके यार! आय फॉरगिव्ह यू…कॉफी…ती, नो थँक्स… मला खरंच तू माफ केलंस ना… मि थोडं जास्तच बोलले तुला त्यावेळी, इतकं बोलायला नको होतं मी… (हात पुढे करून ) फ्रेन्ड्स… त्यानेही मोठ्या मनाने तिच्याशी मैत्री केली. तो दिवस, बस स्टॉपनंतरचा तिसराच दिवस होता. त्यानंतर ते क्लासमध्ये पुन्हा पुन्हा भेटू लागले, एकाच बेंचवर बसू लागले. दिवसागणिक त्यांची मैत्री वाढू लागली होती… एकमेकांच्या नोटबुक एक्सेंज करणं हे तर त्यांचं घरी येण्याजाण्याचं एक कारणच बनलं होतं… त्याचा स्वभाव इतका छान होता की, कोणालाही तो आवडावा…समोरच्याला समजून घेऊन त्याच्याशी वागणं, त्याला मदत करणं, अडचणीच्या वेळी योग्य तो सपोर्ट करणं हा त्याचा स्वभावच होता… दिसायलाही तो बरा होता…
त्या दोघांना भेटून एक आठवडाच झाला होता की, एकमेकांना ते खुपच आवडू लागले होते. दिवसानंतर दिवस गेले… आज त्याच्या पहिल्या भेटीनंतरचा चौदाव्या दिवसाची रात्र होता. ती गच्चीवर चांदण्यांकडे बघत एकटीच बसली होती…ती मनातच म्हणत होती. कधी कळणार रे तुला माझ्या भावना… ती रात्रीची चांदणी त्या चंद्राला काय म्हणते ते ऐकना… माझ्या मनातल्या भावना तुला का कळेना..? रात्रभर असेच विचार राहून राहून तिला सतावत होते. मग ती झोपी गेली… दुसरा दिवस ऊजाडला… तिने ठरवलं होतं की, काही केल्या त्याला प्रपोझ करायचं, आणखी किती दिवस त्याच्यासाठी झुरायचं..? तिने घड्याळाकडे पाहीले, सकाळचे नऊ वाजले होते… घड्याळाकडे पाहत असताना तिची नजर सहजच कॅलेंडरकडे गेली. आज सव्वीस तारीख होती… तशीच ती सॅक घेऊन बस स्टॉपकडे निघाली… थोडं दूर गेल्यावर तिच्या लक्षात आलं की, आज बस स्टॉपवरच्या पहिल्या भेटी नंतरचा बरोबर पंधरावा दिवस होता…
तिला धक्काच बसला. कारण त्याने तिला दिलेलं ते चॅलेंज आठवलं. ज्यानुसार खरंच पंधराव्या दिवशीच ती त्याला आय लव्ह यू म्हणणार होती… बसमध्ये बसून ती कॉलेजला निघाली. कॉलेजला जाईपर्यंत तिने निर्णय घेतला की, काही केल्या आज त्याला आय लव्ह यू म्हणायचं नाही. कारण त्याने माझा इगो हर्ट होऊ शकतो… गाडी कॉलेजवरच्या बस स्टॉपवर थांबली. तो तिथेच हातात गुलाबाचं फुल घेऊन उभा होता. ती गाडीतून उतरली… तिने त्याला विचारलं की, हे फुल कुणासाठी..? तो म्हणाला…आहे कुणासाठी तरी… तिचा परत प्रश्न… मला नाही सांगणार… तो म्हणाला की, ते एक गुपित आहे. ते मी तुला उद्या सांगेन… प्लिज आता पुन्हा विचारु नकोस… ती म्हणाली ठीक आहे चल… तो प्रश्नार्थक भावनेने कुठे..? ती लगेच म्हणाली अरे क्लासमध्ये अजून कुठे..? त्याने उत्तरादाखल म्हणाला, आज मी नाही येणार… आज माझं थोडं काम आहे. तू जा कॉलेजला… तिचा उत्सुकतेचा प्रश्न… अरे कसलं काम, काय बोलतोस तू..? चल ना क्लासमध्ये जाऊया… तो नरवसल्या स्वरात अगं प्लिज मला इन्सिस्ट करु नको तू जा… ती भावूक चेह-याने अरे पण… तो जा म्हटलं ना… ती आवळते घेत जाते जाते चिढतो कशाला एवढा..? असं म्हणून ती वर्गात गेली. वर्गात तिचं मन लागत नव्हतं. तिला कळून चुकलं होतं की, ते तो फुल माझ्यासाठीच घेऊन उभा होता. या आशेवर की, मी ते फुल माझ्या हाताने हक्काने त्याच्याकडून घेईन आणि त्याला आय लव्ह यू म्हणेन… तसं करावं असं खूप वाटत होतं तिला… पण राहून राहून तिचा इगो आड येत होता आणि ते दिलेलं चॅलेंज तिला सारखं आठवत होतं…
क्लास सुटला ती कॉलेजच्या बस स्टॉपकडे वळली. तो तिथेच उभा होता. त्याच्या हातातलं ते फुल सुकलं होतं. पण तो अजून तसाच हसतमुख वाटत होता. तिला वाटत होतं की, तो तिथून गेला असेल. पण त्याला स्टॉपवर बघून ती स्तब्धच झाली… दोघांनी एकमेकांकडे पाहीलं. तेवढ्यात बस आली. ती गोंधळात होती… तिला काही सुचत नव्हतं. बस आल्यावर ती बसमध्ये जाऊन बसली… राहून राहून खिडकीतून ती त्याला आणि तो तिला पाहत होता… घरी पोहोचल्यावर ती खोल विचारात गेली होती. वारंवार त्याचे विचार, त्याचा चेहरा तिच्या मनामध्ये रेंगाळत होता. अशातच रात्र झाली… खरंच हा माझ्यावर इतकं प्रेम करतो. का करतो माझ्यावर इतकं प्रेम..? अशा काही अनुत्तरीत प्रश्नांच्या विचारातच ती झोपी गेली..?
आज एक नवीन दिवस उजाडला…ती आज लवकरच उठली होती. कारण आज तो दिवस उजाडला होता, ज्या दिवसाची ती खुपच आतुरतेने वाट पाहत होती… सकाळची आंघोळ आवरून ती आरशासमोर आली… आरशात बघून स्वतःशीच म्हणाली, किती वेडेपणाने प्रेम करतोस रे तु माझ्यावर? खुपच त्रास दिला ना मी तुला… प्लिज माफ कर मला… मनातल्या मनात ती थोडी खुश होती. कारण तो चेलेंज हरला होता… किती गर्वाने बोलला होता तो मला… असा ती विचार करत होती… तिने आज ठरवलं की, आज माझ्या मनातल्या सर्व भावना मी त्याला सांगणार… तो मला किती आवडतो? सगळं सगळं मी त्याला सांगेन… ती खुपच आतुरतेने नऊ वाजण्याची वाट पाहत होती… नऊ वाजताच ती लगबगीने कॉलेजकडे निघाली. आज आनंदाने एक वेगळीच स्फुर्ती तिच्यात आली होती, एक वेगळंच हसू तिच्या ओठाची शोभा वाढवत होती. बस स्टॉप येण्याची खुपच अधीरतेने वाट पाहत होती. तिने त्याच्यासाठी एक गुलाबाचं फुल घेतलं होतं. तिने आय लव्ह यू म्हणायची प्रॅक्टिस ही केली होती… जस जसा बस स्टॉप जवळ येऊ लागला होता, तस तशी तिच्या हृदयाची धडधड वाढत होती… मघाची अधीरता आता भीतीमध्ये रुपांतरीत झाली होती… कॉलेजचा बस स्टॉप आला, ती बसमधून उतरली… तशीच तिथे जाऊन ती गुलाबाचं फुल घेऊन उभी राहीली, जिथे काल तो उभा होता…
एका अनामिक भीतीने त्याच्या येण्याची वाट बघू लागली… थोड्या वेळाने तोही आला… आज त्याची सॅक थोडी जास्तच जड दिसत होती… तो तिच्याजवळ आला. त्याने तिच्या हातातलं ते गुलाबाचं फुल पाहीलं नव्हतं आणि म्हणाला मला माफ कर… मी चेलेंज हरलो. तुला पंधरा दिवसांच्या आत मिळवण्याचं… ती मनातल्या मनात हसत होती. पहिल्यांदा एक चॅलेंज म्हणून घेतलं होतं मी याला… पण, नंतर नंतर मी खरंच तुझ्यावर प्रेम करून बसलो… मग, ठरवलं की तुला मनातलं सगळं सांगावं आणि मला वाटलं की, मी या पंधरा दिवसांत पूर्णपणे ओळखलं तुला… मला तुझ्या डोळ्यात माझ्याविषयी प्रेम दिसलं आणि तुही मला तितकीच ओळखते असं मला वाटलं होतं आणि म्हणून मी काल ते फुल घेऊन तुझ्यासाठीच ऊभा होतो… ना की माझं चॅलेंज पूर्ण करण्यासाठी… तू येशील आणि ते फुल हक्काने माझ्याकडून मागून घेशील. तू आली, फुलाविषयी चौकशी केली आणि माझ्याच सांगण्याने गेली. मला वाटलं होतं तू माझ्या मनातलं ओळखशील… चॅलेंजबद्दल तर मला आज सकाळी लक्षात आलं. मी आज पुण्याला जातो तिथेच उरलेलं शिक्षण घ्यावं म्हणतो… तुला शेवटचं भेटून जावं, असं मला वाटलं म्हणून मी तुला भेटायला आलो… मी निघतो…. अरे थांब वेड्या! मलाही तुला काही सांगायचं आहे. तू मला कॉलेजच्या दुस-या दिवसापासूनच आवडू लागला होता. पण मी तुला सांगू शकले नव्हते आणि ज्या दिवशी खरंच सांगावसं वाटलं. त्या दिवशी माझा इगो आड आला…
हे फुल मी तुझ्यासाठीच आणलं. तिने हात पुढे करून त्याला आय लव्ह यू म्हणलं… तो ते फुल हात पुढे करून स्वीकारणार… तेवढ्यात, एक मोठी वा-याची झुळूक आली अन ती भानावर आली… मी त्या बस स्टॉपच्या शेजारी असलेल्या मेडीकल स्टोअरवर उभा होतो. मी रामचंद्र काकांना (मेडीकल स्टोअरचे मालक) विचारलं होतं की, काका मी इथे आल्यापासून बघतो की, ती मुलगी दररोज त्या बस स्टॉपवर एक गुलाबाचं फुल घेऊन बरोबर १० ते ५ या वेळेत का उभी असते..? याच्या उत्तरादाखल ते मला या मुलीची कहाणी सांगत होते… इथपर्यंत तिची प्रेम कहाणी ऐकल्यावर खरोखरच मला तिच्या प्रेम कहाणीबद्दल असणारी रुची खुपच वाढली होती… एकदा मी त्या मुलीकडे एका नजरेनं पाहीलं आणि पुन्हा रामचंद्र काकांना उत्सुकतेपोटी विचारलं. मग, त्या मुलाने तिचं प्रेम स्वीकारलं का? सांगा ना, सांगा ना काका, सांगा ना मी खुपच अधीर झालो होतो. ते म्हणाले, अरे थांब सांगतो. काका सांगू लागले… तोही ते फुल स्वीकारण्यासाठी हात पुढे करत होता. तेवढ्यात एक अकल्पित घडलं… क्षणार्धात तो तिच्यापासून खूप लांब जावून पडला होता. कारण एका भरधाव येणा-या ४ चाकी गाडीने त्याला उडवलं होतं… ती हात पुढे करून तशीच उभी होती. तिच्या डोळ्यातला एक अश्रू पावसाचं थेंब जसं आळवाच्या पानावर घरंगळतो तसा तिच्या गालावर घरंगळत होता. क्षणार्धात त्याचा मृत्यू झाला होता.
त्याला मरून पाच वर्षे झाली. पण, तेव्हापासून आजपर्यंत ही मुलगी तिच्या कॉलेजच्या वेळेत १० ते ५ इथे उभी असते. फक्त याच आशेवर की, तो येईल आणि ती हे फुल त्याला देऊन आय लव्ह यू म्हणेन आणि तो तिला घेऊन जाईल… त्या मुलीची कहानी ऐकून माझी आसवं दाटली होती. मनात खुपच प्रश्न उभे होते की, खरंच एवढं प्रेम कुणी करू शकतं का..? मी अश्रू पुसले आणि त्या मुलीकडे बघतच रामचंद्र काकांना विचारलं. हे सर्व तुम्हाला कसं माहीत..? तेवढ्यात माझं लक्ष गेलं की, त्या बस स्टॉपवरचा एक पत्रा हालत होता आणि तो पत्रा तिच्या हाताच्या कोप-याला येऊन धडकला… त्याने तिच्या हातातलं ते फुल रस्त्यावर जाऊन पडलं होतं… ते फुल घेण्यासाठी ती वाकली आणि तिलाही समोरच्या एका ट्रकने उडवलं… ते मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने पाहत होतो… रामचंद्र काकांनी ते पाहताच दुकानाच्या काऊंटरवरून उडी मारून तिच्याकडे धावले. मीही त्याच दिशेने धावत गेलो. ते त्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुलीचे प्रेत आपल्या मांडीवर घेऊन रडू लागले. मी काही वेळ स्तब्ध झालो होतो. ते म्हणत होते, मुली तुझ्या या अभागी बापाला माफ कर… तुझी काळजी मी व्यवस्थितपणे घेऊ शकलो नाही… पण, तुही कुठे माझं ऐकत होती. तुही फक्त तुझ्याच मनाचं करत होती. कसला वेडेपणा केलीस गं तू… त्यांच्या या वागण्यानं मला माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली होती… तेच त्या मुलीचे अभागी बाप होते..
जर त्या मुलीने फक्त त्या एका दिवशी आपला इगो म्हणजेच अहंकार बाजूला ठेवून त्या वाट पाहणा-या आपल्या प्रियकराला आय लव्ह यू हे तीन शब्द म्हटले असते, तर कदाचित तो मेला नसता… कदाचित तिला त्याच्यासाठी पाच वर्षे अश्रू ढाळत त्या स्टॉपवर वाट पाहावी लागली नसती… कदाचित तिचा मृत्यूही झाला नसता आणि कदाचित त्या तिच्या बापाने तिला गमावलं नसतं… म्हणूनच तो एक दिवस किती महत्वाचा असतो… असा एक दिवस प्रत्येक प्रेमविरांच्या आयुष्यात येतो. त्याला हातचं जाऊ देऊ नका… कदाचित तुमचं प्रेम तुम्हाला मिळेल…
सुनील शिरपुरे