जालना जिल्हा व सत्र न्यायालय, जालना येथे 11 फेब्रुवारी 2023 रोजी झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये मोटार अपघात प्रकरणे देखील ठेवण्यात आली होती. त्यातील दोन ते तीन प्रकरणांतील अर्जदार तडजोडीच्या हेतूने न्यायालयाच्या आवारात ॲटोरिक्षाने आले, परंतु त्यांना चालणे शक्य नसल्याने ते ॲटो रिक्षामध्ये बसून होते.
सदरची बाब त्यांच्या वकीलांनी कळवल्यानंतर स्वत: जिल्हा न्यायाधीश श्रीमती अं. वि. चौधरी- इनामदार पॅनल प्रमुख, पॅनल सदस्य ॲडव्होकेट एम.एस. धन्नावत व कोर्ट कर्मचारी यांच्यासह रिक्षाकडे जावून अर्जदार वृध्द महिला व पायाला प्लॅस्टर असलेला अर्जदार यांच्या प्रकरणात तडजोड नोंदवली. या प्रकरणातील विधिज्ञ यांनी सामोपचाराने तडजोड घडवून आणण्यास सहकार्य केले. यावेळी जिल्हा न्यायाधीश श्रीमती ए.डी.देव व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती पी.पी. भारसाकडे – वाघ हे उपस्थित होते.