जालना : कोरोना काळात कोव्हिड-19 महामारीच्या अनुषंगाने सार्वत्रिक रोगप्रतिबंध करण्याचे कर्तव्य बजावत असतांना निधन झाल्या प्रकरणी येथील राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पाचे लेखापाल तथा कोरोना योध्दा (कै.) राजेंद्र पंढरीनाथ मिरगे यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारने मंजूर केलेल्या विमा कवच सानुग्रह सहाय्य निधीचे पन्नास लाख रूपये प्रकल्प संचालक मनोज देशमुख यांच्या हस्ते नुकतेच देण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात गुरूवारी (ता.16) झालेल्या कार्यक्रमात धनादेश देण्यात आला. ता.21 ऑगस्ट 2020 रोजी त्यांचा कर्तव्यावर असतांना मृत्यू झाला होता.
कोरोना महामारीच्या काळात जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधक उपाययोजना राबविण्यासाठी बालकामगार प्रकल्पाचे प्रकल्प संचालक मनोज देशमुख यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. त्यामध्ये जालना जिल्ह्यातील गरजुंना जेवण वाटप, मजुरांना बाहेरगावी पाठविण्याची व्यवस्था, कोरोनाग्रस्तांना दवाखान्यात दाखल करणे, परगावी जाणाऱ्यांना ई-पास मंजुर करणे आदी जबाबदारी देण्यात आली होती. यापैकी बहुतांशी कामे प्रकल्पाचे लेखापाल (कै.) राजेंद्र पंढरीनाथ मिरगे हे पाहात असत. त्याच दरम्यान कामावर असतांना त्यांना कोरोना संसर्ग झाला. दहा दिवसांच्या सततच्या उपचारांना यश न आल्याने ता.21 ऑगस्ट 2020 रोजी त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान या प्रकरणी (कै.) मिरगे यांना राज्याच्या वित्त विभागाच्या दि.20 मे 2020 च्या शासन निर्णयानुसार त्यांचा प्रस्ताव जिल्हाधिकारी जालना यांनी दि.24 सप्टेंबर 2020 रोजी मंत्रालयात पाठविला होता. प्रकल्प संचालक श्री. देशमुख यांनी सतत दोन वर्ष त्या प्रस्तावाचा पाठपुरावा करत दि.20 ऑक्टोबर 2022 रोजी महाराष्ट्र शासनाने दिवंगत राजेंद्र मिरगे यांना 50 लाख रूपयांचा विमा कवच सानुग्रह सहाय्य निधी मंजुर करुण 14 नोव्हेम्बर 22 रोजी जिल्हाधिकारी जालना यांना निधि दिला व त्यानुसार जिल्हाधिकारी जालना यांच्या मान्यतेनंतर आज दि.16 फेब्रुवारी 2023 रोजी मिरगे यांच्या कुटुंबियांना शासनाने मंजुर केलेला 50 लाख रूपये निधीचा चेक प्रकल्प संचालक मनोज देशमुख यांच्याहस्ते त्यांच्या विधवा आई महानंदाबाई पंढरीनाथ मिरगे, पत्नी अंजना राजेंद्र मिरगे यांना सुपूर्द करण्यात आला. या प्रसंगी प्रकल्पातील पूर्व कर्मचारी रेणुका चव्हाण, सुवर्णा कांबळे, योगिता शिंदे, राजु राठोड उपस्थित होते.