भारत हा प्राचीन काळापासून प्रजाहितदक्ष राजा महाराजांचा देश राहिलेला आहे. बहुजन अनार्यांच्या अनेक पराक्रमी राजांनी आपल्या कार्यकर्तृत्वाची छाप प्रजेच्या मनात निर्माण केलेली आहे. बळीराजा, चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक, महाराणा प्रताप, राजर्षी शाहू महाराज इ. उदाहरणे आपल्याला देता येतील. त्याचबरोबर जगाच्या इतिहासात आदर्श राज्यकारभार करून लोककल्याणकारी धोरण राबणारे प्रजाहितदक्ष अव्दितीय राजे म्हणजे विश्ववंदनीय, कूळवाडीभूषण छत्रपती शिवाजी महाराज होय. छत्रपती शिवाजी महाराज ज्या काळात जन्माला आले ते सतरावे शतक ! शिवपूर्वकाळातील सत्ता संघर्षामुळे भरडून निघालेल्या जनतेच्या कल्याणासाठी मराठी मुलुखाचे सुवर्ण सिंहासन उभारून स्वराज्य प्रस्थापित करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य शिवरायांनी केले.
छत्रपती शिवरायांचा कालखंड मध्ययुगाचा कालखंड होय. या कालखंडात राजेशाही पध्दतीने कारभार हा चालवला जात असे. संपूर्ण राज्याची ध्येय धोरणे ही राजाच्या हाती असत. राजा हे पद वंशपरंपरेने राजाच्या पोटी राजघराण्यात जन्म घेतल्याने किंवा कार्यकर्तृत्वाने प्राप्त होत असे. राजेशाही पध्दतीची प्रतिकूल बाजू लक्षात घेतली तर अनेक राजे जनतेवर अन्याय-अत्याचार करून जनतेवर हुकुमशाही गाजवत असत. परंतू छत्रपती शिवरायांच्या राज्यव्यस्थेचा व कार्यकीर्दीचा जर विचार केला तर ‘ न भूतो, न भविष्यती’ अशी आदर्श तितकीच अगम्य, सामान्य जनांना न्याय देणारी, रयतेला जगण्याचं बळ देणारी राज्यव्यवस्था पहायला मिळते.कालांतराने काळाच्या ओघात राजेशाही पध्दती ही कालबाह्य झाली. राजेशाही व्यवस्थेत काही प्रजाहितकारी राजे वगळता अनेक राजांनी जनतेवर अन्याय-अत्याचार केलेले ही आपल्याला इतिहासात पहायला मिळतात. त्यानंतर आपल्या देशाने लोकहितासाठी अनेक लोकचळवळी उभ्या करून लोकशाही शासनपध्दती स्वीकारली. “लोकांनी, लोकांसाठी, लोकांकडून चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही होय. “या व्यवस्थेने इथल्या प्रत्येक नागरिकाला राज्याचा प्रमुख निवडण्याचा व वेळप्रसंगी त्याचा अधिकार काढून घेण्याचा अधिकार प्राप्त करून दिला. लोकशाही ही लोक उन्नतीची एक आदर्श व्यवस्था आहे. परंतु वास्तविक परिस्थितीचा आजचा विचार केला तर जनतेच्या हिताच्या निर्णयांची उचलबांगडी करून स्वतःचे उखळ पांढरे करणारे निर्णय घेणारी व्यवस्था आपल्याला आज पहायला मिळते. तेव्हा पदोपदी आठवण येते ती छत्रपती शिवरायांच्या आदर्श राज्यव्यवस्थेची !!
छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात सहिष्णुता ही पहायला मिळते. अठरापगड जाती-जमातीमधील मावळ्यांना एक करून, जाती-पातीच्या भिंती गाडण्याचे कार्य शिवरायांनी केले. जात-धर्म-पंथ यापेक्षा व्यक्तीच्या कर्तृत्वाला, निष्ठेला अधिक मोल देणारी शिवरायांची राज्यव्यवस्था होती.म्हणुनच स्वराज्यासाठी प्रसंगी जिवाला जीव देणारे मावळे निर्माण झाले. जिवाजी महाले, तानाजी मालुसरे, शिवा काशिद, दर्यासारंग दौलतखान, सिद्दी इब्राहिम, बाजीप्रभू देशपांडे, नेताजी पालकर इ. उदाहरणे आपल्याला देता येतील. मुळात शिवरायांचा दृष्टिकोनच हा सहिष्णूतेचा होता. परंतु आजच्या नावाला लोकशाही असणा-या व्यवस्थेत लोकशाही मूल्यांना खो देऊन, धार्मिक तेढ निर्माण करून, समाजात दु-फळी निर्माण करून, निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीचा फायदा घेऊन स्वार्थ साधेणारे सर्वच नाही पण अनेक नेते इथल्या व्यवस्थेत पहायला मिळतात. ही एक प्रकारे प्रजेची दिशाभूल म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
छत्रपती शिवरायांच्या राज्यव्यवस्थेत स्त्री संरक्षण, स्त्रीविषयक दृष्टीकोन हा मुद्दा लक्षात घेतला तर “स्त्रीयांची इज्जत कायम राहिली पाहिजे. मग स्त्री कोणीही असो!” स्त्रीयांवर अन्याय-अत्याचार करणा-याचा तात्काळ निकाल देत चौरंगा करून शिक्षा देण्याची सक्त ताकीद शिवरायांच्या राज्यव्यवस्थेत होती. परकीयांच्या स्त्रीयांनाही मातेसमान मानण्याचा उद्दात दृष्टीकोन शिवरायांचा व मावळ्यांचा होता. स्त्री सुध्दा आपल्या कार्यकर्तृत्वाने आदर्श राज्यकारभार करू शकते या बाबतीत शिवरायांची सून येसूबाई यांना स्वराज्यातील ‘कुलमुखत्यार’ हे महत्तवपूर्ण पद बहाल केले.तसेच दुसरी सून राणी ताराबाई यांना तलवारबाजी करण्याचा अधिकार दिला. पुढे याच राणी ताराबाईंनी स्वराज्याचे संरक्षण केले. या स्त्रीसंरक्षण व स्त्रीविषयक दृष्टीकोनाचा आढावा आपण आजच्या व्यवस्थेत घेतला तर आजही समाजात स्त्रीयांवरील अन्याय-अत्याचार, हुंडाबळी, स्त्रीभृणहत्या या घटना पहायला मिळतात. घटनेनंतरही आरोपीना शिक्षा ठोठावण्यास होत असलेली दिरंगाई, न्यायाची कित्येक वर्षे करावी लागणारी प्रतिक्षा, आरोपींची निर्दोष मुक्तता हे विचित्र-चित्र स्त्री संरक्षण विषयक बाबतीत पहायला मिळते.
शिवरायांच्या राज्यव्यवस्थेतील कृषीविषयक धोरण लक्षात घेतले तर “शेतक-यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये.” “उत्पन्नाचा आदमास पाहून रयतेवर कर बसवावा.” अशी सक्त ताकीद शिवरायांची होती. बी-बियाणे, गुरे-ढोरे शेतक-यांना द्यावीत. पीक येईपर्यंत धान्य पुरवावे. “सैन्यातील घोड्यांना दाना वैरण लागली तर रोख रक्कम देऊन खरेदी झाली पाहिजे.” शेतक-यांच्या हिताचे अतिशय सूक्ष्म विचार शिवरायांच्या राज्य व्यवस्थेत पहायला मिळतात. याउलट आजची परिस्थिती दृष्टीक्षेपास येते. अवघ्या जगाचं पालपोषण करणा-या बळीराजा संबोधल्या जाणा-या बळीराजाचा जीव बळी जाण्याची विपरित परिस्थिती निर्माण झालेली आहे. बळीराजावर आत्महत्या करण्याची वेळ येतेय यापेक्षा दूर्देव ते काय असू शकत? स्वतः कष्ट करून,घाम गाळून पिकवलेल्या पिकाला हमीभाव मिळावा म्हणून आंदोलने, मोर्चे करण्याची वेळ शेतक-यांवर येते आहे. पाऊस, ओला दुष्काळ, सुका दुष्काळ या नैसर्गिक संकटांनी शेतकरी हताश झालेले तर आहेतच. त्याचबरोबर एकुणच परिस्थितीचा विचार केला असता बेरोजगारी, उपासमारी, दंगली, धार्मिक तेढ, इ.समस्या अधिक निर्माण होत आहेत. महागाई गगनाला जाऊन भिडली आहे. अशा परिस्थितीत ‘जन-सामान्यांचे जगणे’ हा गंभीर चिंतेचा विषय निर्माण झाला आहे.
एकूणच सर्व बाबींचा विचार करता जर आपल्याला आपल्या देशाचे, राज्याचे अस्तित्व व अस्मिता अबाधित ठेवायची असेल तर लोकहितकारी लोकशाही व्यवस्थेत छत्रपती शिवरायांच्या आदर्श राज्यव्यवस्थेची प्रेरणा घेऊन लोकशाही व्यवस्थेस अधिक बळकटी देणे गरजेचे आहे. जाती-धर्म-पंथ यांना अधिक महत्व न देता सामाजीक सलोखा अबाधित राखून स्वातंत्र्य, समता, बंधूता या मूल्यांची जोपासना करावी लागेल. तसेच शिक्षण, आरोग्य, रोजगार, उद्योगधंदे इ. घटकांवर अधिक लक्ष देणे महत्त्वपूर्ण ठरेल. आपल्या आदर्श अशा लोकशाही व्यवस्थेला छत्रपती शिवरायांच्या राज्यव्यवस्थेतील विचार-मूल्यांचे, धोरणांचे अधिष्ठान प्राप्त झाले तर नक्कीच आपला देश महासत्ताक झाल्याशिवाय राहणार नाही.
✍🏻 कल्पना कल्याण घुगे, जालना.
पुढील अपडेट माहित करण्यासाठी हिरकणी अॅप डाऊनलोड करा… डॉऊनलोड करण्यासाठी याच लिंकवर क्लिक करा
https://play.google.com/store/apps/details?id=com.wHirkaniNews_16409978