नांदेड : डीजेच्या तालावर नाचणाऱ्या एका युवकाचा खाली कोसळत मृत्यू झालाय. नांदेडच्या किनवट तालुक्यातील शिवणी गावातील ही घटना आहे. 18 वर्षीय विश्वनाथ जाणगेवाड हा लग्नाच्या वरातीत नाचताना खाली कोसळून मरण पावलाय. काल सांयकाळी घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या तरुणाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याची चर्चा होत आहे. या घटनेने शिवणी गावावर शोककळा पसरलीय. डॉल्बी डीजेचा आवाज हा ह्रदयविकार असणाऱ्या लोकांसाठी धोकादायक असतो. हे आजवर अनेक संशोधनातून सिद्ध झालंय. मात्र अवघ्या 18 वर्षाच्या विश्वनाथला ह्रदयाचा आजार असण्याची शक्यता जवळपास नाहीच अशी आहे. विश्वनाथसारखा मृत्यू आपल्याला यावा, असं वाटत असेल. पण, विश्वनाथचं वय हे जाण्याचे नव्हते. तो क्षणात गेला.
25 फेब्रुवारीला रात्री महाराष्ट्राच्या सीमेवर मात्र तेलंगणा राज्यात असलेल्या पारडी गावात ही घटना घडलीय. विश्वनाथ जानगेवाड याने लग्नाच्या वरातीत नाचायचे म्हणून गावठी स्वरूपाचे उत्तेजक द्रव्य घेतलं होतं. डीजेच्या प्रचंड आवाजात देहभान हरपून विश्वनाथ नाचत होता. अन् नाचताना अचानकपणे खाली कोसळला. पाहणाऱ्यांना वाटलं त्याच्या नृत्याचाच हा भाग आहे की काय. पण बराच वेळ झाला तरी तरुण काही उठत नव्हता. त्यानंतर तपासले तर त्याचा मृत्यू झाल्याचे आढळले.
उत्तेजक द्रव डीजेचा असह्य आवाज आणि त्यात बेफाम होऊन त्याच्या नृत्यामुळे ह्रदयाची गती वाढून त्याचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता आहे. यापूर्वीही लग्न सोहळ्यात नाचताना अनेकांचा अचानकपणे मृत्यू झालाय. त्यामुळे डॉल्बी डीजेपासून तरुणांनी सावध करायला लावणारी ही घटना आहे. आवाजाच्या मर्यादेवर लक्ष नसल्यास काय होऊ शकते हे उदाहरणांसह सांगणारी ही घटना नुसतीच धक्कादायक नाही तर आत्मचिंतन करायला भाग पाडणारी आहे.
लग्न सोहळ्याच्या वरातीत नाचताना विश्वनाथाचा मृत्यू झाल्याने सोहळ्यातील रंगतच निघून गेलीय. गावकऱ्यांनी नवरीच्या स्वागताची तयारी केली असताना त्यांना तरुणांच्या अंत्यविधीची तयारी करावी लागलीय. या प्रकारामुळे शिवणी गावावर शोककळा पसरलीय. किनवट तालुक्यात सर्वत्र याच दुःखद घटनेची चर्चा होतेय.