उरण दि 3 (संगीता ढेरे ) – कामगारांच्या कोणत्याही मागण्या मान्य करत नसल्याने उरण तालुक्यातील भेंडखळ ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या पोलारीस लॉजिस्टिक पार्क (सी डब्लू सी) या कंपनी विरोधात स्थानिक भूमीपुत्र असलेल्या व ज्यांच्या जमिनी या कंपनीसाठी संपादित झाल्या अशा बेरोजगार युवकांनी पोलारिस लॉजिस्टिक पार्क (सीडब्लू सी) कंपनीच्या मनमानी व हुकूमशाही कारभाराचा निषेध करत, विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी सोमवार दि 27 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 9 वाजल्यापासून साखळी उपोषणाला सुरवात केली.
साखळी उपोषण सुरु असूनही कंपनी प्रशासनाचे एक सुद्धा अधिकारी साखळी उपोषण स्थळी फिरकला नाही. साधी कामगारांची विचारपूस सुद्धा केली नाही. जाणून बुजून कंपनी प्रशासनाने 502 कामगारांच्या साखळी उपोषणाकडे जाणून बुजून दुर्लक्ष केल्याने कामगारांनी शेवटी गेट बंद आंदोलनाची हाक दिली तरीही प्रशासन कोणत्याही प्रकारे चर्चेस तयार नसल्याने शेवटी शुक्रवार दि.3 मार्च 2023 रोजी सकाळी 10 वाजता कामगारांनी सर्वच राजकीय पक्षाच्या पाठिंब्याने,सहकार्याने रायगड श्रमिक संघटना तसेच न्यू मेरिटाईम ऍण्ड जनरल कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली सी ब्लू सी लॉजिस्टिक पार्क नोकरी बचाव कामगार समिती भेंडखळच्या माध्यमातून पोलारीस कंपनीच्या गेटसमोरच उन्हात बसून, भूकेची तहानाची पर्वा न करता गेट बंद आंदोलन करून आपला जाहिर निषेध व्यक्त केला. जोपर्यंत मागच्या पूर्ण होत नाहीत, लेखी आश्वासन मिळणार नाही तोपर्यंत गेट बंद आंदोलन सुरूच ठेवू असा निश्चय यावेळी बेरोजगार कामगारांनी केला.
सदर गेट बंद आंदोलन सर्वपक्षीय असल्याने या आंदोलनाला माजी आमदार तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )रायगड जिल्हा प्रमुख मनोहरशेठ भोईर,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील,शिवसेना (बाळासाहेबांची शिवसेना )पक्षाचे रायगड उपजिल्हा प्रमुख अतुल भगत, काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, मनसेचे रायगड जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर , आरपीआयचे तालुका उपाध्यक्ष शिवाजी ठाकूर,आम आदमी पार्टीचे उरण विधानसभा अध्यक्ष- संतोष भगत, भाजप कार्यकर्त्या तथा भेंडखळ ग्रामपंचातच्या विद्यमान सरपंच मंजिता पाटील, जेएनपीटीचे माजी विश्वस्त तथा कामगार नेते काँग्रेड भूषण पाटील, कामगार नेते महादेव घरत, ज्येष्ठ साहित्यिक एल बी पाटील , न्यू मेरिटाईम अँड जनरल कामगार संघटनेचे सरचिटणीस वैभव पाटील,उरण सामाजिक संघटनेचे अध्यक्ष सुधाकर पाटील,पागोटेचे सरपंच कुणाल पाटील , सामाजिक कार्यकर्ते यशवंत म्हात्रे, शेतकरी कामगार पक्षाचे महिला तालुकाध्यक्ष सीमा घरत,उरण तालुका चिटणीस विकास नाईक यांच्या सह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते , विविध सामाजिक संस्था संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी गेट बंद आंदोलन स्थळी प्रत्यक्ष भेट देऊन या आंदोलनाला जाहिर पाठिंबा दिला.पोलीस प्रशासनातर्फे न्हावा शेवा बंदरचे सहाय्यक पोलीस आयुक्त धनाजी क्षीरसागर,उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे, गुन्हे विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण आदींनी मध्यस्थी करून या समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला परंतु तो यशस्वी झाला नाही.आंदोलन स्थळी कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस अधिकारी कर्मचारी तैनात करण्यात आले होते.
कंपनी प्रशासन कामगारांच्या मागण्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करित आहे. कामगारांच्या मागणी कडे दुर्लक्ष केल्याने आम्ही त्यांचा निषेध करतो. कामगारांच्या मागण्या त्वरित मान्य कराव्यात अशी माझी मागणी आहे. – मनोहर शेठ भोईर, माजी आमदार तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )रायगड जिल्हा प्रमुख ज्यांनी ज्यांनी शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या विरोधात भूमिका घेतली. त्यांचे राजकीय भवितव्य नेहमी धोक्यात आलेले आहे. त्यांचे राजकीय भवितव्य संपलेले आहे. कामगारांच्या पाठीशी आम्ही नेहमी उभे आहोत. कोणत्याही कामगारांवर आम्ही अन्याय होऊ देणार नाही.
– अतुल भगत, शिवसेना (बाळासाहेबांची शिवसेना) रायगड उपजिल्हा प्रमुख.
सुरवातीपासूनच बेरोजगार कामगारांना काम मिळावे, नोकरीत स्थानिक भूमीपुत्रांना प्राधान्य मिळावे हि सुरवातीपासून आमची आग्रही भूमिका आहे. जोपर्यंत कामगारांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हा लढा असाच सुरु राहिल. काँग्रेस पक्षाचा या लढ्याला सुरवातीपासूनच पाठिंबा असून काँग्रेस पक्ष स्थानिक भूमीपुत्र असलेल्या बेरोजगार युवकांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे.
– महेंद्र घरत
रायगड जिल्हाध्यक्ष, काँग्रेस.
पोलारिस कंपनीने येथील स्थानिक भूमीपुत्र असलेल आगरी कोळी कराडी समाजावर मोठा अन्याय केला आहे.कंपनी बंद पडली तरी चालेल. मात्र कामगार उपाशी राहता कामा नये. कंपनी प्रशासन कामगारांचे ऐकत नसेल, कामगांराचे प्रश्नच सोडवत नसतील तर असली कंपनी कशाला पाहिजे ? त्यापेक्षा कंपनी बंद पडले तरी चालेल.बेरोजगार युवकांना न्याय मिळवून देणारच.
– प्रशांत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य.
स्थानिक भूमीपुत्र असलेल्या मराठी माणसाला नोकरी मिळाली पाहिजे. नोकरीत प्राधान्य मिळाले पाहिजे. अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची भूमिका असून मराठी माणसांवर, स्थानिक भूमीपुत्रावर झालेला अन्याय मनसे कधीच सहन करणार नाही. बेरोजगार युवकांच्या या आंदोलनाला शेवटपर्यंत मनसेचा पाठिंबा राहिल.
– संदेश ठाकूर
महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रायगड जिल्हाध्यक्ष.
कष्टकरी, बहुजनांच्या न्याय हक्कासाठी रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीया कटीबद्ध असून कामगारांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आरपीआय पक्षाचा स्थानिक भूमीपूत्र असलेल्या बेरोजगार तरुणांना जाहिर पाठींबा आहे. त्यांच्या मागण्या या रास्त असून त्या पूर्ण झाल्याच पाहिजेत.
– शिवाजी ठाकूर तालुका उपाध्यक्ष,आरपीआय,उरण.
आम आदमी पार्टी ही सर्वसामांन्याच्या न्याय हक्कासाठी लढणारी पार्टी असून जो जो भ्रष्टाचार करतो,कामगारांवर अन्याय करतो त्याला शिक्षा झालीच पाहिजे, कामगारांवर उपासमारीची वेळ आणणाऱ्या पोलिरीस कंपनीला धडा शिकविलाच पाहिजे
– संतोष भगत
आम आदमी पार्टी, अध्यक्ष उरण विधानसभा मतदार संघ.
शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांची पिळवणूक चालू असून कंपनी प्रशासनाने गोर गरिबांची पिळवणूक थांबवून त्यांना योग्य तो न्याय द्यावा. कामगारांच्या मागण्या पूर्ण कराव्यात.
– विकास नाईक
शेतकरी कामगार पक्ष, उरण तालुका चिटणीस.
भेंडखळ गावच्या ग्रामस्थांना स्थानिक भूमीपुत्रांना नोकरी मिळालीच पाहिजे. कामगांरावर, शेतकऱ्यांवर कोणताही प्रकारचा अन्याय होऊ नये अशी आमची भूमिका असून भेंडखळ ग्रामपंचायत नेहमी कामगारांच्या पाठिशी आहे.जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तो पर्यंत हे आंदोलन सर्वांनी चालूच ठेवावा. ग्रामपंचायतचा या लढ्याला जाहिर पाठिंबा असून सर्वतोपरी सहकार्य शेवटपर्यंत राहिल.
– मंजिता पाटील विद्यमान सरपंच,ग्रामपंचायत भेंडखळ तथा भाजप कार्यकर्त्या.
कंपनी प्रशासनाचा एकही अधिकारी कर्मचारी कामगारांची बाजू ऐकण्यासाठी येत नाही. कामगारांच्या मागणीकडे दुर्लक्ष करतात ही दु:खाची, खेदाची बाब आहे. कामगारांच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत हिच आमची ठाम भूमिका आहे.
– कॉम्रेड भूषण पाटील, कामगार नेते तथा माजी विश्वस्त जेएनपीटी.