दहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करुन तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पालघरमध्ये घडलाय. दहा वर्षीय अल्पवयीन मुलीचे शाळेत जात असताना अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले. अत्याचारानंतर चिमुकलीची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी आरोपीला तलासरी पोलिसांनी अवघ्यात दोन तासांच्या आत अटक केली आहे. या सर्व प्रकारानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
तलासरीतील डोंगारी येथील दहा वर्षीय चिमुकली शाळेत जात असताना स्कुटी वरून तिचं एका 45 वर्षीय आरोपीने अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर या चिमुकलीची हत्या करून तिचा मृतदेह संजान भिलाड मार्गालगत एका जंगलात फेकून देण्यात आला होता. तलासरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच चार पथकांकडून या चिमुकलीचा शोध सुरु करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी संशयावरुन एकाला ताब्यात घेतलं आणि चौकशी सुरु केली.
चौकशीअंती आरोपीने आपणच हे कृत्य केल्याची कबुली दिली. पीडित चिमुकलीचे आजोबा आणि आरोपी यांच्यात आर्थिक व्यवहारातून वाद असून त्याच्यातून आरोपीने हे कृत्य केल्याचे आरोपीने पोलीस तपासात सांगितले आहे. याप्रकरणी आरोपीविरुद्ध तलासरी पोलीस ठाण्यात भादवि कलम 302 , 376 , पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, तलासरी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
दुसरीकडे पनवेल रेल्वे स्टेशन परिसराजवळ 3 वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला रेल्वे पोलिसांनी अवघ्या पाच तासांत अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकेशकुमार बाबू खा असे आरोपीचे नाव आहे. त्याला नवी मुंबईतील जुईनगर स्थानकातून अटक करण्यात आली आहे. आरोपी भंगाराच्या बाटल्या गोळा करायचा. पीडित मुलीची आई रेल्वे स्टेशनवर झोपलेली असताना आरोपीने तिच्यासोबत हे धक्कादायक कृत्य केले. पीडित मुलीची आई लघुशंकेसाठी गेलेली असताना मुलीला एकटं पाहून आरोपीने तिला उचलून नेले आणि तिच्यावर अत्याचार केला.
यानंतर आरोपी तिथून फरार झाला. त्यानंतर स्टेशन परिसरातून मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार महिलेने रेल्वे पोलिसांकडे केली होती. त्यानंतर काही वेळातच रेल्वे पोलिसांनी चौकशी सुरू केली असता, ती मुलगी स्टेशन परिसराजवळील झुडपात बेशुद्ध अवस्थेत पडल्याचे आढळून आली. पोलिसांनी तात्काळ मुलीला रुग्णालयात दाखल केले आणि सापळा रचून आरोपीला जुईनगर स्थानकातून अटक केली.