प्रवासी घेऊन जाणाऱ्या एस.टी बसचा आणि गॅस सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. पाचोरा जवळील वांगी गावाजवळ हा भीषण अपघाता झाला आहे. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे.
सिल्लोड येथून प्रवासी घेऊन जाणाऱ्या एस.टी. बसचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. हा अपघात पाचोरा जवळील वांगी गावाजवळ घडला. भरधाव वेगात असलेल्या गॅस सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या वाहनाने समोरून बसला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. तर बस मधील तब्बल २१ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमधील ८ ते १० जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.
आज संध्याकाळच्या सुमारास सिल्लोड येथून (एम.एच.१४ बी. टी.४००६ ) या क्रमांकाची बस प्रवासी घेऊन पाचोऱ्याकडे रवाना झाली होती. मात्र, वांगी गावाजवळ गॅस सिलेंडरची वाहतूक करणारा (एम.एच.२१.बी.एच.५३३०) क्रमाकांचे वाहन भरधाव वेगात समोरून येत होते. भरधाव वेगात असणाऱ्या त्या वाहनाने एस.टी. बसला समोरून जोराची धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की, गॅस सिलिंडर वाहतूक करणाऱ्या वाहनाचा अक्षरशः चुराडा झाला आणि त्या वाहन चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर गाडीतील सिलेंडर रस्त्यावर पसरले.
दुसरीकडे एस.टी बसच्या समोरील भागाचा चुराडा झाला. हा भीषण अपघात पाहून गावकरी आणि रस्त्याने जाणारे वाहन चालक यांनी बसमधील जखमींना बाहेर काढले. त्यानंतर या दुर्घटनेबाबत पोलिसांना महिती देत जखमींना मिळेल त्या वाहनातून पोलिसांनी रुग्णालयात हलविले तर काही जखमींना सिल्लोड रुग्णालयात हलविण्यात आले. यातील ६ रुग्णांना औरंगाबादेतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याची माहिती आहे.
अपघातामधील एकूण २१ जण जखमी झाले आहेत, तर १ जण ठार झाल्याची माहिती मिळाली आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून पोलीस जखमी आणि मृतांची ओळख पटवत आहेत. अपघातानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून रस्ता मोकळा करत वाहतूक सुरळीत केली आहे.