मार्च महिना आला की सगळ्यांचं होळी-रंगपंचमीचे वेध लागलेले असतात. अनेकांनी तर दोन चार दिवसा आधीपासूनच योजना बनवायला सुरुवात केली असेलच.‘रेन डान्स’, हौदातली नाहीतर पाण्याचा पाइप लावून रंगांची उधळण करायची असं मनात नक्की ठरवलेलं असेल. पण यंदा जर पाण्याचा गैरवापर आपण टाळू शकलो तर? रंगपंचमीसाठीच नाही तर अगदी पुढचा पाऊस पडेपर्यंत पाणी जपून वापरलं तर? सणाचा आनंद एकत्र येऊन साजरं करण्यात आहे, कोरडे आणि अकृत्रिम रंग वापरू न पाहू या का यंदा? काही वर्षांपूर्वी ची होळी आठवून पाहुयात का?
(पंधरा-वीस वर्षांपूर्वीचे) होळीचे दोन दिवस म्हणजे धुळवड आणि रंगपंचमी. दोन्ही दिवस मजाचमजा. रात्रभर धगधगून मग शांत झालेल्या होळीच्या राखेत पाणी घातलं जायचं आणि मग तो सगळा चिखलच एकमेकांना यथेच्छ फासून धुळवड साजरी होत असे. हा राखेचा चिखल अंगाला का लावायचा तर पुढे येऊ घातलेला उन्हाळा सुसह्य व्हावा म्हणून.. चेहऱ्यावरचा तो चिखल धुऊन काढला की माणसं कशी आतून उजळलेली, आनंदी दिसत. मग सात-आठ दिवसांच्या अंतराने यायची ती रंगपंचमी. आम्ही राहायचो त्या भागातले सगळेच लोक मोठय़ा उत्साहात रंगपंचमी खेळत. त्या दिवसाची सुरुवात मात्र मनावर कायमची कोरली गेली आहे. पहाटे लवकर उठून, सगळी कामे आटोपून शुभ्र वस्त्रं आणि खारिक वाटीची किंवा बताश्याच्या माळा चढवल्या जात. मग वाटीत कालवलेल्या रंगाचे दोन बोट लावून रंगोत्सवाला सुरुवात करायची. वाडय़ातल्या चौकात मधोमध पाण्याने भरलेला एक छोटा ड्रम असायचा. त्या पाण्यात गुलाल मिसळला की रंग तयार. पाच-सहा मित्रमैत्रिणींमध्ये मिळून एकच पिचकारी असायची..पण आनंद कधी उणावला नाही. माझ्या बालपणाचा एवढा हाच एक रंग आता लक्षात आहे.
लहान मुलांसाठी छोटे-छोटे प्लास्टिकचे टब ठेवून त्यात रंग मिसळला जायचा आणि सेलिब्रेशन व्हायचं.
हे काही एकमेव उदाहरण नाही. थोडय़ाफार फरकानं याच प्रकारे होळी साजरी केली जाते अलीकडे.. पाण्याचा नाहक उपसा.. गैरवापर. आपल्याकडे सगळेच सण-उत्सव लहानमोठय़ा प्रमाणावर साजरे करण्याची परंपरा आहे. रोजच्या कामाच्या धबडग्यातून थोडा वेळ वेगळा काढून, ताण-तणाव विसरून आनंद उपभोगता यावा, हा खरंतर या सणांचा साधा अर्थ. होळीपुढे उभं राहून खच्चून वाईटसाईट बोलत मनातली भडास होळीत जाळून टाकत मन स्वच्छ करणं असो नाहीतर वय-जात-धर्म-लिंग-आर्थिक स्तर वगैरे सगळे भेद विसरून मुक्त मनानं एकमेकांना रंगवणं असो, निखळ आनंद देण्याची क्षमता असलेल्या कित्येक प्रथा आपल्यापाशी आहेत. पण आजचं चित्र खूप वेगळं असल्याचं जाणवतंय. मुळात सगळे सण-उत्सव साजरे करण्याला एक प्रकारचं बाजारी स्वरूप आलंय. प्रत्येक सण जसा काही ‘इव्हेंट’ होत चालला आहे. जोरदार खरेदी..गरजेची-बिनगरजेची..पण ‘सेलिब्रेट’ करायचं म्हटलं की बाजार गाठणं कर्तव्यप्राप्त ठरलंय. सणांसाठी सततचं उसनं अवसान आणताना साधेपणा कुठे हरवलाय? कायमच का सगळं झगझगीत-झकपक हवंहवंसं वाटू लागलंय?
आजकाल होळीच्या निमित्ताने कित्येक ठिकाणी ‘रेन डान्स’सारखे चैनीचे प्रकार सुरू असतात. होळी-रंगपंचमीच्या पाश्र्वभूमीवर तर रिसॉर्टला जाऊन ‘होली सेलिब्रेट’ करण्याची नवीच पद्धत रूढ होत आहे. थेंबभर पाण्याला महाग झालेल्यांची ही केवढी क्रूर चेष्टा! आमच्याकडे आहे ना मुबलक पाणी, मग आम्ही ते वाट्टेल तसं वापरणार. गाडय़ा धुणार..टेरेस-बाल्कनी धुऊन काढणार, फिल्मस्टार्स करतात म्हणून त्यांच्यासारखीच ‘होली’ खेळून हजारो लिटर पाणी वाया घालवणार..आम्हाला काय त्याचं?..ही बेपर्वा वृत्ती घातक आहे.
प्रथा-परंपरांचा अन्वयार्थ नव्यानं समजून घेण्याची वेळ नक्कीच आली आहे. रोजच्या एकसुरी कंटाळवाण्या रूटीनला सुट्टी देऊन स्वत:सोबत घरच्यांना-नातलगांना आणि मित्रपरिवाराला ज्याला ‘क्वालिटी टाइम’ असं छानसं नाव आहे..असा वेळ देणं, भेटत राहणं, आस्थेनं विचारणा करण…..हे समजून घ्यायला हवं. सणांचं ओझं वाटून न घेता फक्त रोजच्या दिवसापेक्षा एक वेगळा आनंदाचा-मजेचा दिवस, इतपत तर आपण करू शकतोच. शिवाय होळी रंगपंचमी म्हटलं की पाण्याचा यथेच्छ वापर केलाच पाहिजे का.. कोरडी रंगपंचमीसुद्धा तेवढाच आनंद देऊ शकत नाही का? पाण्याचा गैरवापर टाळण्यासाठी आपल्या सणांच्या आनंदावरच गदा आणली पाहिजे असे नाही तर रोजच्या वापरातही आपण पाण्याचा वापर काळजीपूर्वक करण्याची निकड निर्माण झाली आहे. विविध उद्योगधंद्यांना लागणाऱ्या पाण्याचा वापर कसोशीने सांभाळण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण राज्यातल्या वेगवेगळ्या गावांत पाण्याची गंभीर अवस्था निर्माण होते आहे.ऐवढच नाही तर होळीतही चांगल्या लाकडे जाळण्यापेक्षा कुडा कचरा, टाकाऊ सामान आधीपासूनच जमा करून ठेवलं तर तो कचराही नष्ट होईल आणि पर्यावरण रक्षण होईल. आज अशाप्रकारची होळी अनेक जण साजरा करायला लागले आहेतच, गरज आहे ती प्रोत्साहनाची. या सगळ्याचा अर्थ असा आजिबात नाही की तन-मन रंगवून टाकणारा हा सुंदर सण साजरा करूच नये. कुठल्याही गोष्टीच्या टोकाला जाण्यापेक्षा सुवर्णमध्य काढणं केव्हाही श्रेयस्कर. आसपासच्या परिस्थितीचं भान राखून पर्यावरणस्नेही असे नैसर्गिक कोरडे रंग वापरता येतील. बाजारात जाऊन आग्रहपूर्वक ते आणायलाच हवेत का? सगळ्या नैसर्गिक रंगछटा सहजपणे मिळून जातात. हळद, पळस, पालक, बीट असे वनस्पतीजन्य रंग बाजारात उपलब्ध असतात. हे रंग वापरण्याचे अनेक फायदे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रंग खेळून झाल्यानंतर ते धुऊन काढायला कृत्रिम रंगांच्या तुलनेत पाणी कमी लागतं. आणि लहानमोठय़ा सगळ्यांच्याच आरोग्याच्या दृष्टीने हे रंग अगदी सुरक्षित असतात.
वेळीच भानावर येऊन कृती केली नाही तर होळीचे रंगच काय, पण पुरणपोळीसुद्धा गोड वाटणार नाही. एकूणच आपल्या सगळ्यांचीच धडपड रोजचं जगणं अजून चांगलं, आनंदाचं करण्यासाठीच तर आहे ना! आपले सण तर जगण्याचा उत्सव करा अशी शिकवण देणारे..या होळी-रंगपंचमीच्या निमित्ताने त्याकडे जरा अधिक सजगतेनं पाहूया का?
पर्यावरणपूरक होळी साजरी झाली तर पर्यावरणाचं संतुलन राखलं जाईल आणि होळीचा आनंदही लुटता येईल.
परस्पर स्नेहभाव जोपासणं, तो वृद्धिंगत करणं हे प्रत्येक सणाच्या साजरीकरणामागचं उद्दिष्ट असला पाहिजे. म्हणूनच रंगपंचमी साजरी करत असताना आपल्या अतिउत्साहामुळे रंगाचा बेरंग होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. दुसर्याला रंग लावत असताना त्याच्या आवडी निवडीचाही विचार करायला हवा..होळीच्या नावाखाली एकमेकांना शिवीगाळ करणे, बोंब मारने हे प्रकार थांबविले गले तर फारच उत्तम. आपल्या येणाऱ्या सोनेरी उद्यासाठी पाण्याची बचत करण्याचा संकल्प करून ही होळी साजरी करुया…
रूचिरा बेटकर,नांदेड.
9970774211