फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यानंतर लगेचच उन्हाच्या झळा जाणवू लागल्या असं असतानाच मार्च महिन्यात हा उन्हाळा आणखी तीव्र होणार असे संकेतही मिळाले. पण, पुन्हा एकदा हवामानानं रंगरुप बदललं असून, राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळीचा तडाखा बसताना दिसत आहे. देशातील इतर राज्यांमध्येसुद्धा अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे.
राज्यात एकीकडे उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असतानाच आता विदर्भासाठीही हवामान विभागानं महत्त्वाचा इशारा दिला आहे. धुळवडीपासून म्हजेच 7 मार्च (मंगळवार)पासून इथं पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अकोला, वाशिम, अमरावतीत गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, मराठवाड्यासह काही भागात गारपीट होण्याचाही इशारा देण्यात आला आहे. मंगळवारपासून पश्चिम महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गारपीट आणि अवकाळी पावसाची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांनाही काळजी घेत संकटाला सामोरं जाण्याचं आवाहन करण्यात येत आहे. हवामानात झालेला हा बदल पाहता रब्बी पिकं हातातून जाण्याची भीती सध्या बळीराजाला भेडसावत आहे.
वसई विरारमधील शहरी भागासह ग्रामीण भागातही अवकाळी पावसानं हजेरी लावली. ज्यामुळं मत्स्यव्यवसायावर उदरनिर्वाह करणाऱ्या कोळी बांधवांचं मोठं नुकसान झालं. अर्नाळा समुद्र किनारी कोळी बांधवांनी सुकवण्यासाठी टाकलेल्या मासळीवर पावसाचं पाणी पडल्याने मासळी खराब झाली. सुकवण्यासाठी लावलेले बोंबील, करदी, तारली, जवळा अशा लाखो रूपायांच्या मासळीचं नुकसान झाल्याची माहिती समोर आली.