जालना, दि. 27 मार्च – शहरातील नळ गल्ली भागात एकाच नावाच्या दोन दुकाना सुरु असून त्यातील एक दुकान ही बेकायदेशीर असल्याची तक्रार जिल्हाधिकारी यांना देण्यात आली. परंतु, या दुकानावर कारवाई होत नाही. सदरील बेकायदेशीर फटाका दुकानाला स्थानिक अधिकारी अभय देत असल्याने रोष व्यक्त करण्यात येत आहे.
जालना शहरातील नळ गल्ली भागात एन. एस फटाका मार्ट नावाच्या दोन दुकाना आहेत. त्यातील एका दुकानाला म्हणजेच घर क्र. 2-14-78 या जागेवर फटाका दुकान सुरु करण्याची परवानगी काढण्यात आली होती. आणि त्या जागेवर फटाका दुकान सुरु आहे. परंतु, ज्या जागेवर परवानगी देण्यात आली होती त्या जागेवर एक दुकान सुरु असतांना पुन्हा दुसर्या जागेवर म्हणजेच घर क्र. 2-14-77 या ठिकाणी देखील त्याच नावाने दुसरे दुकान सुरु करण्यात आले. हा प्रकार शासकीय अधिकार्यांच्या डोळ्यात धुळ फेकणारा होता. त्यामुळे या दुकानाची तक्रार करुन दिलीप सखाराम जैन यांनी बेकायदेशीर दुकान सुरु असल्याचा प्रकार नगर पालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला होता. त्यावर पालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या जबाबदार अधिकार्यांनी कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे ही दुकान आजही राजरोसपणे सुरु आहे. या बेकायदेशीर दुकानाला कोण कोण अधिकारी सहारा देतात त्यांची आता चौकशी होणे गरजेचे असल्याचे तक्रारदार यांनी म्हटले आहे.
या प्रकरणात अधिकारी कारवाई करण्यात उदासीन का आहेत? त्यांना बेकायदेशीर दुकानदाराकडून काही मिळते का? असे अनेक प्रश्न कारवाई होत नसल्याने निर्माण होत आहे.