जालना तालुक्यातील मानेगाव खालसा येथे मारोतीचे जुने मंदीर पाडताना मंदीराचा कळस जेसीबीवर पडल्याने जेसीबी चालक प्रकाश भगवान जाधव वय वर्ष 37 यांचा जागीच मृत्यु झाला. ही घटना आज दि. 15 एप्रिल 2023 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडली.
मानेगाव खालसा येथे जुने पुरात मारोतीचे मंदीर आहे. ते मंदीर पाडून त्याचे नुतनीकरण करण्यात येणार होते. त्यामुळे जुने मंदीर पाडण्यासाठी प्रकाश भगवान जाधव हे त्यांचे जेसीबी घेऊन सकाळी 8 वाजता मंदीराजवळ गेले होते. या मंदीराचे काम सुरु असतांना सकाळी 10 वाजेच्या सुमारास काळाने घाला घातला आणि मंदिराचा कळस थेट जेसीबीवरच कोसळला. कळस कोसळल्याने जेसीबीचा चेंदामेंदा झाला असून त्यात दबून प्रकाश भगवान जाधव यांचा जागीच दर्दैवी अंत झाला. जेसीबी चालकाला एक चार वर्षाचा मुलगा असून दिड वर्षाची मुलगी आहे. अल्पवयातच मुलं आपल्या बापाला पोरकी झाल्याने मोठा दुखःचा डोंगर जाधव कुटुंबावर कोसळलाय.
सदरील जेसीबी चालकाला शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलय. या घटनेची माहिती मिळताच मौजपुरी पोलीसांनी फौज फाट्यासह घटनास्थळी भेटी दिली आहे. या घटनेमुळे गावात आणि परिसरात शोककळा पसरली आहे.