जालना तालुक्यातील गुंडेवाडी येथील सरपंच मनोहर पोटे यांनी डमी पावतीबुक (टॅक्स बुक) छपाई करून गुंडेवाडी परिसरातील कंपन्यांकडून लाखो रूपये वसुल केल्याचा आरोप शिवसेना प्रनित किसान सेनेचे जिल्हाध्यक्ष नारायण गजर पाटील यांनी केलाय. या प्रकरणी सरपंच यांच्यासह त्यांना साथ देणारे त्यांचे छोटे भाऊ विकास पोटे आणि वडील ज्ञानेश्वर पोटे यांच्याविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी नारायणराव गजर पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केलीय.
जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गुंडेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये 20 ते 22 कारखाने असून या कारखान्यांकडून गुंडेवाडीचे सरपंच मनोहर पोटे यांनी डमी पावतीबुक (टॅक्स बुक) छापुन लाखो रूपये वसुल केले आहे. तसेच त्यांना त्यांच्या भावाने आणि वडीलांनी सहकार्य करुन कंपन्यांवर दबाव आणून डमी टॅक्स बुकाद्वारे कंपन्यांची आणि ग्रामस्थांची फसवणूक केलीय. कंपन्यांना दिलेल्या पावतीबद्दल ग्रामसेवक वसावे यांनी त्या टॅक्स पावत्या ग्रामपंचायतच्या नसल्याचे आणि त्या पावतीवर असलेली स्वाक्षरी देखील आपली नसल्याचे सांगीतले.
सदरील पावती बुकावरील नंबर देखील ग्रामपंचायतला उपलब्ध नसल्याचा दावा त्यांनी केलाय. कारखानदारांना दिलेल्या पावत्या या प्रत्येकी 80 हजार रूपयांच्या आहेत. पावती क्र 7, 8 आणि 9 अशा क्रमांकाच्या या पावत्या असून त्या पावत्यांची एकुण रक्कम 2 लाख 40 हजार रूपये आहेत. विशेष म्हणजे या पावत्याच्या आधारे रोख रक्कम एकाच कंपनीकडून घेतल्याचे निदर्शनास येत आहे. खरे तर ग्रामपंचायतच्या टॅक्स पावतीची रक्कम कारखानदारांकडून चेकद्वारे घेतली जाते. परंतू, अद्याप घेतलेली नगद रक्कम बँकेला जमा न करता परस्पर हडप करण्याचे काम या लोकांनी केले असल्याचेही नारायण गजर पाटील यांनी केलाय.