जालना- केंद्रीय राखीव पोलीस दल आणि शीघ्र कृती दलाच्या दंगा नियंत्रण पथकाच्या जवानांसह सदर बाजार पोलिसांनी शहरातून संयुक्त रूट मार्च केले.
शहरात कुठलाच अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास केंद्रीय पोलिसांसह स्थानिक पोलिस प्रशासन देखील पूर्णपणे सज्ज असल्याचा संदेश देत नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी हे रूट मार्च काढण्यात आल्याची माहिती सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी दिली.
शहरातील मामा चौक येथून या पथसंचलनाची सुरवात करण्यात आली. मोती मस्जिद ,फुल बाजार ,उडपी चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, मंगळ बाजार ,काद्राबाद चौक ,पाणीवेस ,सुभाष चौक मार्गे शोभा प्रकाश मंगल कार्यालय येथे या रूट मार्चचे समारोप करण्यात आले.
उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या या रूट मार्च मध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या मुंबई येथील शीघ्र कृती दलाचे 72 अधिकारी , जवान आणि स्थानिक पोलीसांचा फौजफाटा सहभागी झाला होता.