जालना नांदेड समृद्धी महामार्गासाठी संपादित केलेल्या जमिनीचा अजूनही आम्हाला मावेजा मिळाला नाही.मग आमदार गोरंटयाल यांना 500 कोटी रुपयांचा घोटाळा दिसलाच कुठं असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.आज समृद्धी महामार्गात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन त्यांना निवेदन दिलं यावेळी शेतकऱ्यांनी हा सवाल उपस्थित केला आहे.
आम्ही चोर असल्याचा उल्लेख काल गोरंटयाल यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न मांडताना केला. आओ चोरो बांधो भारा, आधा तुम्हारा आधा हमारा असं गोरंटयाल विधानसभेत म्हणाले.आम्ही चोर नसून जगाचे पोशिंदे आहोत.आमही पिकवणं बंद केल्यास तुम्हाला भाकरीला देखील दाणे मिळणार नाही अशी टीका यावेळी शेतकऱ्यांनी गोरंटयाल यांच्यावर केली.
आमदार गोरंटयाल हे शेतकऱ्यांवर खोटे आरोप करत असून आमच्या पोटावर पाय देत आहे.या महामार्गासाठी सगळ्या आमदारांनी पत्र दिले आहे.मात्र आमदार गोरंटयाल यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने पत्र दिले नाही.त्यांचा या प्रकल्पाला विरोध आहे.त्यांनी आजपर्यंत विधानसभेत एकही प्रश्न शेतकऱ्यांच्या बाजूने प्रश्न उपस्थित केला नाही.आम्हाला भीक लागत नसून आमचा हक्क पाहिजे असेही यावेळी शेतकऱ्यांनी गोरंटयाल यांना ठणकावले.
जालना नांदेड समृद्धी महामार्ग प्रकल्प बाधित शेतकऱ्यांनी आपल्या निवेदनात आमदार यांच्या स्पष्टीकरणासाठी काही बाबी मांडल्या आहेत, त्या पुढील प्रमाणे आहे.
आमदार हे शहरी भागातील मतदार संघाचे नेतृत्व करीत आहात. कृपया हे स्पष्टपणे लक्षात घ्यावे की ह्याच शहरी मतदारसंघाचे नातेवाईक आप्तेष्ट हे जालना जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकरी असून ह्या प्रकल्पामध्ये कवडीमोल दराने महामार्ग बांधणीसाठी शासन आमच्या जमिनी घेत आहेत. कृपया आपण आपल्या कुशाग्र कौशल्याने आणि अभ्यासू ज्ञानाने हा प्रश्नही विधानसभेत मांडावा ही विनंती ही निवेदनातील शेतकऱ्यांचे पाहिले स्पष्टीकरण आहे. आमदारांनी आरोप केलेला आहे की शेतकऱ्यांच्या शेतात पाच ते दहा फूट विहिरी खोदलेले असून 50 ते 100 फूट विहिरीची नोंद घेतली आहे. आमदारांनी हे स्पष्ट करावे की पाच ते दहा फूट विहिरी आपण पुराव्यानिशी मांडाव्यात आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या शेतकऱ्यांवर कष्टकऱ्यांवर केलेले आरोप सिद्ध करून दाखवावे अशी शेतकऱ्यांची दुसरी मागणी आहे.
आमदार यांनी कधीतरी शेतकन्यांच्या हिताचे प्रश्न विधानभवनात मांडावेत जेणेकरून आमचे आशीर्वाद आपणास लागतील. विशेष करून महामार्गाच्या अत्यल्प मोबदला, महामार्गामुळे स्थलांतरित होणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रश्न व अडचणी, महामार्गामुळे विभागले गेलेली गावे त्यातील शेती यांना येण्या जाण्याकरिता जोड रस्ता, भूमिहीन शेतकऱ्यांचे पुनर्वसन हे मुद्दे आपल्यासारख्या प्रखंड बुद्धिमानी विद्वान आमदारास सूचित का नाहीत भोळ्या भाबड्या शेतकऱ्यांच्या आकलना पलीकडील आहे.
आमदारांनी आरोप केलेल्या बोगस झाडे, फळबागा, विहिरी इत्यादी घटकांची नोंद घेऊन सुमारे 500 कोटींचा घोटाळा झाला आहे परंतु अजून तर मोबदल्याच्या नोटिसा आणि मिळणारे मूल्यांकन ह्या सर्व बाबी प्रलंबित असून आपणास कुठली तज्ञ समिती हे भविष्य सांगत आहे हे कृपया स्पष्ट करावे अशी शेतकऱ्यांची चौथी मागणी आहे.
आमदार यांनी अशा प्रकारचे बिनबुडाचे वक्तव्य करून सभागृहाचा वेळ वाया घालवला असून त्यांनी सभागृहाची माफी मागावी असं देखील शेतकऱ्यांनी आपल्या निवेदनात म्हटलय.
या प्रकल्पाला अगोदरच खुप विलंब झालेला असून होणारा अतिरिक्त खर्च आणि वेळ वाचवावा आणि विलंब झाल्यामुळे रस्त्याच्या कामासाठी जो अतिरिक्त पैसा जाणार आहे त्याची शासनाने दाखल घ्यावी असं ही निवेदनात नमूद करण्यात आलं आहे.
यावेळी जालना नांदेड समृद्धी महामार्ग प्रकल्प बाधित शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात दिले यावेळी जालना नांदेड समृद्धी महामार्ग प्रकल्प बाधित शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.