जालना :- जिल्ह्यातील नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी, शासनाबद्दल आणि शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृध्दींगत व्हावा यासाठी विशेष मोहिम व लोकाभिमुख उपक्रम नियोजित आहेत. महसूल दिनानिमित्त 1 ऑगस्ट पासून ते 7 ऑगस्ट 2023 या कालावधीत महसूल सप्ताह राबविण्यात येणार असून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी नागरिकांनी महसूल विभागाशी संबंधित कामकाजाविषयी आपापल्या तालुक्यातील शिबीराच्या माध्यमातून लाभ घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
महसूल सप्ताहानिमित्त दि.1 ऑगस्ट 2023 रोजी महसूल दिन साजरा व महसूल सप्ताहाचा शुभारंभ करण्यात येईल. यावेळी महसूल विभागात उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना गौरविण्यात येवून सन्मानित करण्यात येईल. तसेच नागरिकांकडून दाखल सर्व प्रकरणे ई-हक्क पोर्टलवर तलाठ्यांमार्फत, सेतूसुविधा केंद्रामार्फत नोंदी घेण्यात येतील. यावर तहसीलदार व नगरभूमापन अधिकारी दुरुस्तीचे आदेश पारित करतील. गाव तेथे स्मशानभूमी, दफनभूमी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येईल.
दि.2 ऑगस्ट रोजी युवा संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल. यात दहावी बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी वय, राष्ट्रीयत्व व अधिवास, उत्पन्न, नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र तसेच शैक्षणिक विविध दाखले व प्रमाणपत्राचे वितरण करण्यात येईल. शालेय विद्यार्थ्यांचे आधारकार्ड तयार करणे व पात्र उमेदवारांना जात प्रमाणपत्राचे वितरण करण्यात येईल. अनाथ मुले-मुली म्हणजे आई-वडिल मृत्यूमुखी पडल्यामुळे अनाथ झालेली व कोणत्याही शासकीय, निमशासकीय, शासन अनुदानित आश्रमात न राहणारे मुले-मुलींना अनुज्ञेय असलेले लाभ मिळण्याच्या अनुषंगाने अनाथ असल्याचे तलाठी व ग्रामसेवक तसेच संबंधित महिला व बाल विकास अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र वितरण करण्यात येईल.
दि.3 ऑगस्ट रोजी एक हात मदतीचा कार्यक्रमात खरीप हंगामातील पिकांचा विमा काढण्यासाठी अर्जदाराच्या मागणीनूसार पिक पेरा अहवाल, सातबारा अहवाल व 8-अ व विविध दाखल्यांचे वितरण करण्यात येईल. तसेच अतिवृष्टी व पुर अशा नैसर्गिक आपत्तीच्या परिस्थितीत नागरिकांनी घ्यावयाची काळजी याबाबत जनजागृती करण्यात येईल.
दि.4 ऑगस्ट रोजी जनसंवाद कार्यक्रमात महसूल अदालतीचे आयोजन करण्यात येईल तसेच सलोखा योजना, गावागावातील व शेतातील रस्ते संबंधित प्रकरणे निकाली काढण्यात येतील. आपले सरकार पोर्टलवरील प्राप्त तक्रारी निकाली काढण्यात येतील. दि.5 ऑगस्ट रोजी सैनिक हो तुमच्यासाठी कार्यक्रमातंर्गत संरक्षण दलातील अधिकारी, सैनिकांना निर्गमित होणाऱ्या विविध दाखल्याबाबत जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी व समादेशक अधिकाऱ्यांमार्फत कार्यवाही करण्यात येईल. दि.6 ऑगस्ट रोजी महसूल संवर्गातील कार्यरत व सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी संवाद कार्यक्रमातंर्गत कार्यरत व सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित सेवा विषयकबाबी निकाली काढण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात येईल. तर दि.7 ऑगस्ट रोजी सप्ताह कालावधीत घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांची दखल घेत समारोप करण्यात येईल. अशा भरगच्च कार्यक्रमाच्या आयोजनाच्या माध्यमातून महसूल सप्ताह साजरा करण्यात येणार आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.