जालना जिल्हा परिषदेची 2015 पासून रखडलेली भरती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मिना यांच्या नियंत्रणाखाली सुरू झालीय. जालना जिल्हा परिषदेची 2019 मध्ये भरती करण्यात येणार होती. त्यासाठी उमेदवारांनी अर्जही सादर केले होते. परंतु, मराठा आरक्षणाच्या निर्णयामुळे ही सर्वच भरती प्रक्रिया रेंगाळली होती. जालना जिल्हा परिषदेत एकूण 42 संवर्गं असून त्यापैकी 19 संवर्गांमध्ये ही पदभरती होणार आहे. यामध्ये एकूण 467 पदे भरली जाणार आहेत.
या संदर्भातील सविस्तर माहिती दिनांक 4 ऑगस्टच्या मध्यरात्रीनंतर जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने पाहायला मिळणार आहे. या भरती प्रक्रियेची ऑनलाईन लिंक देखील उमेदवारांना फॉर्म भरण्यासाठी खुली करुन देण्यात येणार आहे. जालना जिल्हा परिषदेच्या www.zpjalna.com या वेबसाईटवर उमेदवाराला नियम अटी आणि अर्ज करण्याची पद्धत पाहायला मिळणार आहे. या संदर्भात जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा मीना यांनी ही माहिती दिली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती कोमल कोरे यांचीही उपस्थिती होती. यामध्ये सर्वाधीक आरोग्य सेवक पुरुष 109, आरोग्य सेवक महिला 182, औषधी निर्माण अधिकारी 12, कंत्राटी ग्रामसेवक 50, कनिष्ठ अभियंता स्थापत्य 23, कनिष्ठ लेखा अधिकारी दोन, कनिष्ठ सहाय्यक 12, कनिष्ठ सहाय्यक लेखा पाच, पशुधन पर्यवेक्षक चार, प्रयोगशाळा तंत्रज्ञ एक, लघुलेखक उच्च श्रेणी एक, लघुलेखक निम्न श्रेणी एक, वरिष्ठ सहाय्यक लेखा चार, विस्तार अधिकारी शिक्षण वर्ग तीन श्रेणी दोन एक, विस्तार अधिकारी सांख्यिकी तीन, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक सात, पर्यवेक्षिका सात, अशा एकूण 467 पदांची भरती होणार आहे.