जालना : तालुक्यातील निपाणी पोखरी गावात शिक्षणप्रेमी ग्रामस्थ व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी लोकसहभागातून जिल्हा परिषद शाळेसाठी जमीन घेऊन वर्गखोली बांधली. गरिबांच्या मुलांच्या शिक्षणासाठी निर्माण केलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या वर्ग खोलीचे समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे व हभप नाना महाराज पोखरीकर यांच्या हस्ते रविवारी लोकार्पण झाले. गरिबांची मुलेमुली शिकत असलेली ही शाळा सतीश घाटगे यांनी दत्तक घेतल्याची घोषणा करून दोन वर्षात ही शाळा मॉडेल बनविण्याचा शब्द गावकऱ्यांना दिला.
या कार्यक्रमास नसडगावचे माजी सरपंच लहूराव देशमुख, माजी पंचायत समिती सदस्य प्रकाशराव टकले, भाजप नेते भगवान भुतेकर, किसन बापू शिंदे,उटवद गावचे उपसरपंच बबनराव टेकाळे, पंकज रक्ताटे, रामेश्वर भुतेकर, एकनाथ भुंबर, सुधाकर उबाळे, निपाणी पोखरीचे सरपंच गणेश आडागळे, उपसरपंच सविता भुतेकर,ग्राम विकास अधिकारी प्रवीण पवार,संदीप भुतेकर, प्रकाश भुतेकर, अंकुश भुतेकर, भगवान भुतेकर आदी उपस्थित होते.
पंचवीस वर्षे ज्या मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून आलेले लोकप्रतिनिधी शिक्षण महर्षी म्हणून भूषवतात. त्यांच्या मतदार संघातील एखाद्या गावाला लोकवर्गणी करून शाळा बांधावी लागत असेल तर तुम्ही शिक्षण महर्षी कसे? असा सवाल त्यांनी नाव न घेता राजेश टोपेंना आपल्या भाषणातून विचारला. निपाणी पोखरी गावातील गावकऱ्यांनी गरिबांच्या मुलांसाठी घेतलेला पुढाकार आणि केलेले कार्य कौतुकास्पद आहे. गावकऱ्यांना अधिक बळ मिळावे यासाठी ही शाळा दत्त्तक घेऊन रोल मॉडेल बनविण्यासाठी आवश्यक ते सहकार्य व मदत करणार असल्याचे सतीश घाटगे यांनी सांगितले. या शाळेसाठी डिजिटल टीचिंग बोर्ड, टेबल, संघणक आदीसाठी मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमात हभप नाना महाराज पोखरीकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, ज्ञानमंदिर हे आदर्श पिढी आणि नागरिक घडवते. संपत्ती चोरी जाऊ शकते , तिच्या वाटण्या होऊ शकतात परंतु, बौद्धिक संपत्ती चोरता येत नाही. शिक्षण हे शास्त्र आणि शस्त्र या दोन्ही भूमिका निभावते. गावकऱ्यांनी गरिबांच्या मुलासाठी केलेल्या कार्याचे त्यांनी कौतुक केले. या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थी व आदर्श शिक्षकांचा सतीश घाटगे व पोखरीकर महाराजांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. गौरव केला. गावातील नव्या पिढीसाठी आणि गावकऱ्यांच्या भल्यासाठी झटणारे गावचे सरपंच, उपसरपंच सदस्य व त्यांना खंबीर साथ देणारे गावकरी या गावात आहे.निपाणी पोखरी हे गाव आदर्श व्हावं यासाठीही मी मदत करणार आहे.
शाळेच्या लोकार्पण प्रसंगी आलेल्या मान्यवरांचे शाळेतील चिमुकल्या मुलांनी लेझीमच्या गजरात स्वागत केले. यावेळी मेरी माझी माती -माझा देश अभियाना अंतर्गत अमृत वाटिकासाठी अमृत कलश तयार करण्यात आला. हा अमृत कलश दिल्ली येथे नेण्यात येणार आहे. यावेळी शाळा परिसरात वृक्षरोपणही करण्यात आले. यावेळी गावातील महिला व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.