कोल्हापूर : ज्याची भूमिका सत्याची आहे ते कोणत्याही चौकशीला घाबरत नाहीत. पक्षातील अनेकांना ‘ईडी’ची नोटीस दिली होती. हे लोक ‘ईडी’ला का घाबरले, हा खरा प्रश्न असून, कारवाई होणार म्हटल्यावर यातील अनेकांनी आपली भूमिका बदलली आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षातून बाहेर गेलेल्यांना उद्देशून येथे लगावला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सभा शुक्रवारी येथील दसरा मैदानात झाली. यावेळी पक्ष फुटीवर भाष्य करताना त्यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्या नेत्यांविषयी प्रथमच संशय व्यक्त करत टीकास्त्र सोडले आहे.
पवार म्हणाले, की ज्यांनी काही गैरप्रकार केलेले नाहीत ते अशा चौकशीला घाबरत नसतात. मलाही ‘ईडी’ची नोटीस आली होती. त्यात उद्या या म्हटले असताना मी आताच येतो म्हणून निघालो. मात्र, पोलिसांनी घरी येऊन हात जोडून तुम्ही येऊ नका, म्हणून विनंती केली. आरोप ठेवलेल्या बँकेतून मी कधी कर्ज घेतले नव्हते. केवळ भीती घालण्याचा प्रयत्न केला होता. ज्याची भूमिका सत्याची आहे ते घाबरत नाहीत. पक्षातून बाहेर पडलेल्या या बहुतेक नेत्यांना ‘ईडी’ची नोटीस आलेली आहे. या लोकांनी काही केलेले नाहीतर त्यांनी चौकशीला सामोरे जायला हवे होते. परंतु आपल्यावर कारवाई होणार म्हटल्यावर यातील अनेकांनी आपली भूमिका लगोलग बदलली, असा टोला पवार यांनी लगावला.