जालना – आंबेगाव येथील इसमावर जालना शहरात उपचार सुरु असतांना प्राणांतिक हल्ला करणार्या चौघांना दहा वर्षे सश्रम कारावास आणि पंचवीस हजार रुपयांचा दंडाची शिक्षा जालना येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावलीय.
या घटनेत तपासी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक गणेश झलवार यांनी तर सरकारी वकील म्हणून अॅड. बाबासाहेब इंगळे यांनी कामकाज पाहिलेय. दि. 8 जून 2019 रोजी आंबेगाव तालुका जाफराबाद येथे शेतीच्या वादातून मारहाण झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर जखमी इसमांना जालना येथे उपचारासाठी दाखल केले होते. उपचार सुरु असतांना दोघांवर जालना शहरात येऊन काही जणांनी जीवघेणा हल्ला केला होता.
यावेळी फिर्यादी कृष्णा विश्वासराव हिवाळे आणि शिवाजी संतोष शेवाळे यांच्या अंगावर कार घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्नही करण्यात आला होता. तसेच त्यांना काही जणांनी लोखंडी आणि रॉड लठ्या-काठ्यांनी मारहाण केली होती. या प्रकरणात सदर बाजार पोलीस ठाण्यात भादवी कलम 307 सह इतर कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचा तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश झलवार यांनी करुन आरोपींना अटक केली होती. त्यानंतर त्यांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. या गुन्ह्यात सर्व साक्षीदार तपासल्यानंतर आज जिल्हा सत्र न्यायाधीश श्री जयस्वाल यांनी आरोपी मधुकर नामदेव देठे, अशोक मोहन हिवाळे, ज्ञानदेव मोहन हिवाळे आणि शेषराव मोहन हिवाळे यांना दहा वर्षे सश्रम कारावास आणि पंचवीस हजार रुपयांची दंड अशी शिक्षा सुनावलीय. या प्रकरणात विशेष सरकारी वकील अॅड. बाबासाहेब इंगळे यांनी सरकार पक्षातर्फे कामकाज पाहिले तर पोलीस उपनिरीक्षक गणेश झलवार यांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते.