जालना – शेतामधील सामायिक विहिरीचे पाणी तिसर्याला का दिले या कारणावरुन मौजपुरी येथील योगेश बाबासाहेब डोंगरे या 25 वर्षीय तरुणाचा निर्घूनपणे खून केल्याची धक्कादायक घटना घडलीय. दि. 16 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
योगेश आणि त्याच्या चुलत भावाचा शेतातील विहिरीच्या पाणी वाटपावरुन वाद सुरु झाला होता. योगेशने सामाईक विहिरीचे पाणी तिसर्याला दिले होते. त्यावरुन शालीकराम उर्फ सावळाराम डोंगरे व इतरांचा सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास वाद झाला. हे प्रकरण गावकर्यांनी मध्यस्थी करुन मिटविले. पंरतु रात्री 11 वाजेच्या सुमारास बाहेरगावाहून पंडीत आसाराम डोंगरे हा गावात आला आणि पुन्हा वाद सुरु झाला. यावेळी योगेश बाबासाहेब डोंगरे, प्रल्हाद चांगुजी डोंगरे, गणेश डोंगरे, शिल्पा योगेश डोंगरे आणि शोभा डोंगरे यांना पंडीत आसाराम डोंगरे आणि शालीकराम उर्फ सावळाराम डोंगरे यांनी त्याच्या सहकार्यासह लोखंडी रॉड आणि लाकडाने मारहाण करायला सुरुवात केली. या मारहाणीत योगेश डोंगरे याच्या डोक्यात घरावरुन जाड लाकूड फेकून मारले. त्यात त्याच्या डोक्याला गंभीर मार लागून त्याचा जागीच मृत्यु झाला.
योगेशच्या डोक्यात आणि डोळ्यावर खोलवर जखम झाली. योगेश रक्ताच्या थारोळ्यात असतांना गावातील काही नागरीकांनी त्याला उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. परंतु, त्याला तीथे न घेता जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविले. जिल्हा सामान्य रुग्णालयात डॉक्टरांनी योगेशला तपासून मृत घोषीत केलं. या प्रकरणी मौजपुरी पोलीस ठाण्यात पंडीत डोंगरे, शालीकराम उर्फ सावळाराम डोंगरे, रामेश्वर डोंगरे, पवन टोम्पे, आसाराम डोंगरे आणि दोन महिला या 7 जणांविरुद्ध खून करणे आणि खूनाचा प्रयत्न करणे यासह इतर गुन्हे दाखल करण्यात आलेत. यामध्ये कमल 302, 307, 324, 323, 143,147, 148, 149, 504, 506 यानुसार गुन्हे दाखल करण्यात आलेत. या प्रकरणात 5 आरोपींना पोलीसांनी अटक केली असून 2 जन फरार असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिलीय.