घनसावंगी – सन २०२२ -२३ मध्ये समृद्धी साखर कारखान्यात गाळप झालेल्या शेतकऱ्यांच्या उसाला मराठवाड्यात उच्चांकी भाव देण्याचा विक्रम कारखान्याने केला आहे. येणाऱ्या काळातही शेतकऱ्यांच्या उसाला सर्वाधिक भाव देण्याबरोबर भविष्यात उसाच्या भावाबाबत मराठवाड्यातील साखर कारखान्यांची दिशा ठरवण्याच काम ‘समृद्धी’ कारखाना करेल, असा विश्वास समृद्धी कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांनी व्यक्त केला आहे.
कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे, व्हाईस चेअरमन महेंद्र मेठी यांच्या प्रमुख उपस्थितीत समृद्धी साखर कारखान्याचा गाळप हंगाम २०२३-२४ चा बॉयलर अग्नि प्रदिपण समारंभ बुधवारी (दि.२५) उत्साहात पार पडला. ऊस उत्पादक शेतकरी व वाहतूक कंत्राटदार यांच्या हस्ते सपत्नीक पूजनाने बॉयलरचे अग्नी प्रदिपन झाले.या कार्यक्रमास भाजपचे ज्येष्ठ नेते रामेश्वर भांदरगे,भाजप तालुकाध्यक्ष शिवाजीराव बोबडे, अंबड बाजार समितीचे उपसभापती अरुण घुगे, संचालक शिवाजीराव कटारे, बालाजी खोजे, केदार राठी, ज्ञानेश्वर डोईफोडे, कारखान्याच्या संचालिका वैशाली घाटगे, संचालक दिलीप मामा फलके, अभिजीत उढाण,रणजीत उढाण,विकास शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
गाळप हंगाम २०२२-२३ मध्ये गाळप झालेल्या शेतकऱ्यांच्या उसाल समृद्धी कारखान्याने एफआरपी पेक्षा ११० रुपये वाढीव मोबदला दिला आहे. शेतकऱ्यांना अंतिम बिल २८०० रुपये प्रति मॅट्रिक टन प्रमाणे अदा करण्यात येत आहे. अडचणीच्या काळात सभासद शेतकऱ्यांनी समृद्धी कारखान्यावर विश्वास टाकून साथ दिली. त्यांच्यामुळेच समृद्धी कारखाना वाचला आणि मोठा होऊ शकला. शेतकऱ्यांनी संकटात दिलेली साथ अमुल्य होती.आता कारखान्याला चांगले दिवस येत आहे.याचे भागीदारही सर्व शेतकरी सभासद असतील. असे सतीश घाटगे यांनी पुढे बोलताना सांगितले. यंदाच्या लागवड हंगामात २० नोव्हेंबर २०२३ च्या आत उसाची लागवड करणाऱ्या तसेच खोडवा व्यवस्थापन (संवर्धन ) करणाऱ्या शेतकऱ्यांच्या उसाला प्रोत्साहन म्हणून १०० रुपये प्रती मेट्रिक टन प्रमाणे अतिरिक्त भाव देण्यात येईल. अशी घोषणा यावेळी सतीश घाटगे यांनी केली.
याच भागातील इतर कारखाने नफ्यात असतानाही शेतकऱ्यांना योग्य भाव देऊ शकले नाहीत. शेतकऱ्यांनी या विरोधात आवाज उठवून अधिकच्या भावाची मागणी केली पाहिजे. उसाचे राजकारण होण्याऐवजी उसाच्या भावासाठी कारखान्यांमध्ये स्पर्धा होऊन शेतकऱ्यांचा फायदा झाला पाहिजे,अशी माझी भूमिका आहे.यापुढे अंबड, घनसावंगी व जालना तालुक्यात उसाचे राजकारण मी होऊ देणार नाही. यंदाच्या गाळप हंगामात उस तोडणीसाठी शेतकऱ्यांनी घाई करू नये.तसेच बाहेरच्या जिल्ह्यातील कारखान्यास उस देऊ नये. कारण त्यांच्या दराबद्दल हमी मिळू शकत नाही. समृद्धी कारखान्याकडून ऊस तोडणीचे नियोजन करण्यात आले असून, झालेल्या नोंदणी प्रोग्राम प्रमाणे शेतकऱ्यांचा ऊस वेळेत नेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असे घाटगे यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बाबा उढाण यांनी केले. कार्यक्रमास कारखान्याचे सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांसह सभासद शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थितहोते.
विहीरीसाठीच्या अर्थसहाय्याचा लाभ घ्यावा
समृद्धी कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जलसमृद्ध करण्यासाठी पन्नास टक्के अर्थसहाय्य देण्याची योजना सुरु केली आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी या योजनेतून पन्नास टक्के अर्थसहाय्य समृद्धी कारखाना करणार आहे. या अर्थसहाय्याची परतफेड शेतकऱ्यांच्या उसातून केली जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन सतीश घाटगे यांनी यावेळी केले.
हक्काच्या पाण्यासाठी संघर्ष करणार
मराठवाड्याच्या हक्काचे पाणी पश्चिम महाराष्ट्रातील धरणात अडवण्यात आले आहे. यावर्षी पर्ज्यन्यमान कमी झाल्याने येत्या काळात पाण्याची टंचाई भासणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील धरणातील मराठवाड्याचे हक्काचे पाणी महिनाभरात जायकवाडीत न सोडल्यास शेती आणि पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. ही बाब गांभीर्याने घेऊन मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी न्यायालयीन लढाईबरोबर रस्त्यावरची लढावी देखील लढायला मागे हटणार नाही. असेही सतीश घाटगे यांनी यावेळी स्पष्ट केले.
इथेनॉल प्रकल्प लवकरच होणार सुरु
समृद्धी कारखाना १०० कोटी रुपये गुंतवणूक करून १८० केएलपीडी क्षमतेचा इथेनॉल प्रकल्प उभारत आहे. या प्रकल्पाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. या इथेनॉल प्रकल्पामुळे शेकडो युवकांना आपल्या तालुक्यातच रोजगार मिळणार आहे. तसेच शेतकऱ्यांच्या उसाला एफआरपी पेक्षा ३०० ते ३५० रुपये जास्तीचा दर देता येईल.