मंठा – मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध करत विविध मागण्यांसाठी ओबीसी समाजबांधवाच्या वतीने रविवारी (ता. 29) मंठा शहरात मोर्चा काढण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करत प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
छत्रपती संभाजी महाराज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज सुखापर्यंत मोर्चा काढण्यात आला. मोर्चात हजारो ओबीसी समाजबांधव सहभागी होते. पाच हजारांवर दुचाकींही होत्या. नाही कुणाच्या बाबाच आहे आमच्या हक्काच अशा घोषणा देत हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौकात आला. यावेळी मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण देऊ नये, ओबीसी शिष्यवृत्तीमध्ये वाढ करावी, जातीनिहाय जनगणना करावी आदी मागण्या करण्यात आल्या. मराठा समाजाला आरक्षण द्यावे; पण ओबीसी कोट्यातून नको, अशा भावना आंदोलकांनी व्यक्त केल्या. ओबीसी समाजात अनेक भटक्या विमुक्त जाती आहेत. त्या आर्थिक व शैक्षणिकदृष्ट्या सक्षम नाहीत. त्यावर शासनाने उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली. यावेळी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये, ओबीसी प्रवर्गासाठी नॉन क्रिमिलेयरची अट रद्द करावी, बिहारच्या धर्तीवर जातीनिहाय जनगणना करावी, मराठवाड्यात दिलेल्या बनावट कुणबी प्रमाणपत्रांची चौकशी करा, जिल्हास्तरावर ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह उभारावे, ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ करावी, तांडा वस्ती सुधार योजनेत जिल्ह्यासाठी 100 कोटींची तरतूद करावी, ओबीसी-व्हीजेएनटी प्रवर्गाच्या अनुशेषाच्या जागा भराव्यात
परिसरातील ओबीसी समाजबांधवांनी आपली दुकान करून मोर्चात सहभाग नोंदवला. बंजारा समाजबांधवही पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते. दरम्यान, ओबीसी नेते छगनराव भुजबळ यांच्याबद्दल मनोज जरांगे यांनी एकेरी भाषेत उल्लेख केल्याच्या पार्श्वभूमीवर आंदोलकांनी घोषणाबाजी करत विरोध दर्शविला. आमदार गोपीचंद पडळकर यांचा जयजयकार करत पूर्ण परिसर दणाणून सोडला. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृती जागवून अनेकजण भावुक झाल्याचे दिसले.