जालना (प्रतिनिधी) – इनरव्हील क्लब जालना होरायझनतर्फे शाळा दत्तक घेऊन राबविण्यात येत असलेल्या हॅपी स्कूल संकल्पनेअंतर्गत जालना तालुक्यातील रामनगर येथील जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक शैक्षणिक आणि क्रीडा साहित्यासह भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, त्याचा लोकार्पण सोहळा दि. 27 ऑक्टोबर रोजी उत्साहात पार पडला.
यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून समाजकार्य महाविद्यालयाच्या असिस्टंट प्रोफेसर तथा सामाजिक कार्यकर्त्या डॉ. रेणुका भावसार, डॉ. सुजाता नानावटी ह्या उपस्थित होत्या. व्यासपीठावर क्लबच्या अध्यक्षा शिखा गोयल, सचिव सोनिया मिश्रीकोटकर, उर्वशी खंडेलवाल, एड. अश्विनी धन्नावत, आरती भक्कड यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी शाळेसाठी वालपेंटिंग, हॅन्डवॉश स्टेशन, डायस/मोडीयम लायब्ररी, अरो वाटर फिल्टर, सॉफ्टवेअर, ग्रीन बोर्ड, क्रीडा साहित्य, झोका घसरपट्टी, साऊंड बॉक्स आदी साहित्याचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण झाले आणि खर्या अर्थाने स्कूल हॅपी करण्यात आले.
यावेळी डॉ. सुजाता नानावटी यांनी गुड व बॅडटचबाबत मार्गदर्शन करताना सांगितले की, मुलांना योग्य वेळी आणि योग्य वयात काही गोष्टींबद्दल सांगणे गरजेचे असते. दुसर्या व्यक्तींशी कसे वागावे हे सुद्धा शिकवावे. एखाद्या व्यक्तीने तुम्हाला कोणत्या हेतूने स्पर्श केला आहे हे सुद्धा पालकांनी आपल्या मुलांना वेळीच सांगितले पाहिजे. जेणेकरून मुलं चुकीच्या गोष्टीवेळी वेळीच बोलू शकतील. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलासोबत एक मित्रत्वाचे नाते तयार केले पाहिजेच. पण त्याला गुड टच आणि बेंड टचमधील नेमके अंतर काय हे सुद्धा स्पष्टपणे सांगितले पाहिजे, असे त्या म्हणाल्या. क्लबच्या अध्यक्षा शिखा गोयल म्हणाल्या की, क्लबच्या माध्यमातून 2 शाळांमध्ये हॅपी स्कूल ही संकल्पना राबविण्यात येत आहे. आणखी एक शाळा यात समाविष्ट केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना सर्व सुविधा शाळेत मिळाव्यात आणि त्या माध्यमातून आनंददायी वातावरणात त्यांनी ज्ञानार्जन करून आपले ध्येय गाठावे, यासाठी ही संकल्पना राबविण्यात येत आहे, असे त्या म्हणाल्या. या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.