मराठा आरक्षणावरून सध्या राज्यामध्ये राजकारण तापलं आहे. अशामध्ये मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण उपसमितीची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात आणि मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर अतिशय महत्वाची उपसमतिची बैठक पार पडली. या बैठकमध्ये अतिशय तपशीलवार चर्चा झाल्याचे सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, ‘आजच्या उपसमितीसोबत झालेल्या बैठकीमध्ये अतिशय तपशीलवार चर्चा झाली. त्यामध्ये शिंदे समिती गठीत केली होती. जुन्या कुणबी नोंदी तपासण्यासाठी आणि शोधण्यासाठी त्या समीतीने पहिला अहवाल आज सादर केला. तो उद्या आम्ही कॅबिनेटमध्ये घेऊन तो स्वीकारून त्याची पुढची प्रक्रिया करणार आहोत. शिंदे समितीमध्ये जवळपास एक कोटी ७२ लाख कागदपत्रांची तपासणी झाली. त्यात ११,५३० कुणबी जुन्या नोंदी आढळून आल्या आहेत.’
मराठा आरक्षणाचे पुरावे जमा करण्यासाठी टाटा इंस्टीट्यूट आणि गोखले इंस्टीट्यूटची मदत घेणार आहे. त्यांच्याकडून पुरावे मिळण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. सरकार पूर्ण गंभीर आहे. मराठा समाजाने विश्वास ठेवला पाहिजे. समाजासमाजात तेढ निर्माण होईल, असे काही करु नये, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.