परभणी : मराठा आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला असून आंदोलनाचे तीव्र पडसाद राज्यात उमटत आहेत. दरम्यान आंदोलनाला हिंसक वळण आल्याने अनेक ठिकाणी बसची जाळपोळ व दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. यामुळे परभणी जिल्ह्यातील बससेवा सलग दुसऱ्या दिवशी बंद ठेवण्यात आली आहे.
राज्यामध्ये सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असल्याने तीव्र पडसाद उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्यांची तोडफोड होऊ नये आणि नुकसान होऊ नये; यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या परभणी विभागातील सातही आगारातील वाहतूक कालपासून बंद करण्यात आली आहे. आजही वाहतूक बंद असल्याने प्रवाशांना सकाळपासून गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.