उरण (तृप्ती भोईर) – रयत शिक्षण संस्थेच्या पंचरत्न इंग्लिश माध्यम शाळा पिरकोन या शाळेत विद्यार्थ्यांसाठी स्वच्छ व शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध होण्याकरिता, उरण व द्रोणागिरी येथील वी क्लब ऑफ द्रोणागिरी , माई फाऊंडेशन सामाजिक संस्था, कै. तृप्ती सुर्वे स्मृती फाउंडेशन यांच्या त्रिवेणी संगमाने पुढाकार घेऊन पंचरत्न इंग्लिश मिडीयम स्कूल या शाळेत आरो वॉटर प्युरिफायर देणगी स्वरुपात दिला आहे.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ गौरी देशपांडे यांच्या प्रयत्ना मुळे या सामाजिक संस्थांनी विद्यार्थ्यांच्या स्वास्थ्याचा विचार करून ही देणगी देऊन शाळेस उपकृत केले. शालेय विकास समिती तर्फे वि क्लब ऑफ द्रोणागिरी व माई फाउंडेशन सामाजिक संस्थांच्या अध्यक्षा श्लोक पाटील,तृप्ती सुर्वे फाउंडेशनच्या अध्यक्षा कल्पना सुर्वे,आरती ढोले, शुभांगी शिंदे, नम्रता या सर्व संस्थांच्या कार्यकर्त्यांचे मनपूर्वक आभार मानण्यात आले. त्याचबरोबर आपल्या पाल्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने या संस्थांनी केलेली पिण्याच्या पाण्याची सुविधा या उपक्रमाचे पालकांनीही स्वागत केले.