जालना – जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते आज प्रातिनिधीक स्वरुपात तीन युवकांना कुणबी प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. प्रमाणपत्र मिळाल्याबद्दल या युवकांनी समाधान व्यक्त करत शासनाचे आभार मानले. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या छोटेखानी कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार, निवासी उपजिल्हाधिकारी केशवे नेटके, अंबडचे उपविभागीय अधिकारी दीपक पाटील यांची उपस्थिती होती.
राज्य शासनाने नियुक्त केलेले सेवानिवृत्त न्यायमूर्ती संदिप शिंदे समितीने जालना जिल्ह्यातील कुणबी समाजाच्या नोंदी तपासण्यासाठी 12 ऑक्टोबर रोजी जालना जिल्ह्याचा दौरा केला होता. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध शासकीय कार्यालयातील कागदपत्रांच्या नोंदी आणि नागरिकांनी सादर केलेले पुरावे तपासून त्याचा अहवाल राज्य शासनाकडे सादर केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात नुकत्याच पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा प्राथमिक अहवाल स्विकारला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहवाल स्विकारल्यानंतर कुणबी नोंदीचे पुरावे सादर करणाऱ्यांना तात्काळ जात प्रमाणपत्र वितरीत करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज अंबड तालुक्यातील तीन युवकांना कुणबी प्रमाणपत्र व पुस्तिकेचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या युवकांमध्ये अंबड तालुक्यातील बारसवाडा येथील रोहित राजेश गायकवाड, कार्तिक राजेश गायकवाड आणि दाढेगाव येथील भरत अरुणराव रत्नपारखे यांचा समावेश आहे. वंशावळी, वारसा आदी कागदपत्रात कुणबी नोंदी आढळल्या आहेत, त्यांना कुणबी प्रमाणपत्राचे दाखले देण्यात येणार आहे. कुणबी प्रमाणपत्राचे 2 हजार 770 अभिलेख स्कॅन करण्याची प्रक्रीया पूर्ण करण्यात आली असून ही सर्व नावे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या jalna.gov.in या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली आहेत. ज्यांना प्रमाणपत्र हवे आहे, त्यांना या संकेतस्थळावर आपले नाव पाहता येतील. कुणबी प्रमाणपत्रासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे अर्ज करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.