जालना – अनेक प्रकारचे बेकायदेशीर बहाने करत सातत्याने वेळकाढूपणाचे धोरण आखत नगर आणि नाशिकच्या पुढार्यांच्या दबावाखाली असलेले राज्य सरकार 30 ऑक्टोबर रोजी जायकवाडीत पाणी सोडणे बंधनकारक असतांनाही गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या अधिकार्यांवर दबाव आणून हक्काचे पाणी सोडू देत नव्हते. त्यामुळे मराठवाड्यातील जनतेत प्रचंड आक्रोश आणि चिड पण हताशा पसरली होती आणि त्यातच गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता स. का. सब्बीनवार यांनी मराठा समाजाच्या आंदोलनामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला असल्यामुळे जायकवाडी धरणात पाणी सोडू नका असा ई-मेल राज्याच्या प्रधान सचिव (पाटबंधारे) यांना केला आणि ही बातमी समजल्यानंतर मराठा समाज आणि आरक्षण आंदोलनातील कार्यकर्ते, समन्वयक यांच्यात सार्वत्रिक संतापाची लाट पसरली आणि मराठा समाज आणि आंदोलनाला बदनाम करण्याचे हे कुटील कारस्थान आणि कट आहे असे लक्षात येऊन सकळ मराठा समाजाच्या छत्रपती संभाजीनगर येथील समन्वयक, वेगवेगळ्या सामाजिक संघटना, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी छत्रपती संभाजीनगर येथील महामंडळाच्या कार्यालयात धाव घेतली आणि महामंडळाचे कार्यकारी संचालक श्री संतोष तिरमनवार यांना घेराव घालून जबर घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला आणि जाब विचारण्यास सुरुवात केली. तसेच संबंधित वरिष्ठ अधिकारी आणि वेगवेगळे मंत्री, आमदार यांच्याशी संपर्क साधून आपल्या तीव्र भावना कानावर घालून तातडीने पाणी सोडण्यासाठी आग्रह करून शेकडो समाज बांधवांनी कार्यकारी संचालकांना त्यांच्याच केबिनमध्ये घेराव घालून ठिय्या आंदोलन चालू केले. कार्यकर्त्यांचे उग्र आंदोलन, ‘एक मराठा-लाख मराठा, जय जिजाऊ-जय शिवराय, मराठा समाज आणि मराठा आंदोलनाची बदनामी सहन करणार नाही’ ई. गगनभेदी घोषणा यामुळे अधिकारी आणि पोलिसांची प्रचंड गडबड उडून संबंधीत खात्याचे वरिष्ठ अधिकारी, मंत्रालय, मंत्र्यांशी फोनाफोनी चालू झाली. संबंधित अधिक्षक अभियंता यांनी मराठा समाजाची लेखी बिनशर्त माफी मागावी, त्यांना सेवेतून बडतर्फ करावे आणि तातडीने जायकवाडी धरणात हक्काचे पाणी सोडावे, पाणी सोडल्याशिवाय घेराव आणि ठिय्या आंदोलन परत घेण्यासाठी सकळ मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा, छावा, छावा क्रांतीवीर आदी संघटनांनी ठाम नकार देऊन गोदावरी पाटबंधारे महामंडळातच तीव्र आंदोलन चालू ठेवले. जालन्यासह मराठवाड्यातील सकळ मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चा आणि अनेक सामाजिक संघटनांनी राजेंद्र दातेपाटील, प्रा चंद्रकांत भराट, शैलेश भिसे, सुरेश वाकडे, रेखा वाह्तुळे, सुकन्या भोसले, संदिप शेळके, संदिप जाधव, गणेश थोरात, विजय गोघरे, रवींद्र वाह्तुळे, किशोर चव्हाण आदी समन्वयकांशी संपर्क साधून छत्रपती संभाजी नगर येथे महामंडळ कार्यालयाकडे धाव घेतली. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याशी संपर्क करून मराठा समाजाच्या तीव्र भावना त्यांच्या कानावर घालून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री संबंधित अधिकारी यांच्याशी संपर्क करून अधिका-याने माफी मागावी आणि तातडीने पाणी सोडण्यासाठी बोलणी करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा आणि सकळ मराठा समाजाचे राज्य समन्वयक डॉ. संजय लाखेपाटील यांनी केली तसेच आपल्या आणि सकळ मराठा समाजाच्या तीव्र भावना महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार यांना फोन करून कानावर घातल्या.
मराठा समाजाच्या अतिशय ऊग्र भावना आणि वाढती संख्या बघून वरिष्ठ अधिकारी आणि महामंडळ,सरकारने नमते घेत संबंधित अधिका-यांनी लेखी माफीनामा लिहून दिला. तर वरच्या धरणातून तातडीने पाणी सोडण्याचे आदेश निर्गमित करून तसे लेखी पत्र सुध्दा त्यांनी सकळ मराठा समाज समन्वयक आणि छावा श्रमिक संघटना यांचे संस्थापक अध्यक्ष शैलेश भिसे पाटील यांना दिले. आणि फोनद्वारे नाशिक नगरच्या संबंधित धरण अधिकारी वर्गाशी सर्वांसमोरच संपर्क करून तातडीने पाणी सोडण्यासाठी आदेश दिले. आणि त्या आदेशानुसार नियोजन करून वरच्या धरणातून पाणी सोडण्यासाठी धरणांचे दरवाजे उघडे करून नदी पात्रात मध्यरात्री पासून पाणी सोडण्यासाठी सुरूवात केली आहे. त्यामुळे मराठा समाजासह संपूर्ण मराठवाड्यात आनंदाची लाट पसरली आहे. न्यायालय, कायदे, वरिष्ठांचे आदेशाला न जुमानणारे गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे अति नाठाळ अधिकारी यांना वठणीवर आणून त्यांना पाणी सोडण्यासाठी सकळ मराठा समाज आणि मराठा समाजाच्या विविध सामाजिक संघटनांनी भाग पाडून प्रत्यक्ष नदीपात्रात पाणी आल्याचा आनंद साजरा करण्यासाठी ऊद्या दि. 26 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 2 वा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आनंदोत्सव साजरा करण्यात येणार आहे. तसेच सकळ मराठा समाज छत्रपती संभाजी नगर आणि तेथील विविध सामाजिक संघटना यांचे पदाधिकारी ज्यांनी सकाळीच महामंडळात धाव घेऊन कार्यकारी संचालकांना मराठा समाजाची माफी मागण्यासाठी आणि वरच्या धरणातून पाणी सोडण्यासाठी लेखी आदेश देण्यास बाध्य केले त्या लढवय्या समाज बांधव, भगिनींचा सर्वश्री राजेंद्र दातेपाटील, प्रा चंद्रकांत भराट, शैलेश भिसे, सुरेश वाकडे, रेखा वाह्तुळे, सुकन्या भोसले, संदिप शेळके, संदिप जाधव, गणेश थोरात, विजय गोघरे, रवींद्र वाह्तुळे, किशोर चव्हाण आदींचा सत्कार करण्यात येणार आहे. त्यासाठी सकळ मराठा समाजासह जालनेकर नागरीक, विविध क्षेत्रातील पदाधिकारी, उद्योजक, व्यापारी, डॉक्टर, वकील यांनी उपस्थित रहावे असे आवाहन मराठा क्रांती मोर्चा आणि सकळ मराठा समाजाचे राज्य समन्वयक डॉ. संजय लाखेपाटील, सुनीलबापू आर्दड, राजेश राऊत, प्रशांत पाटील वाढेकर, किशोर आबा मरकड, दिनेश फलके, अरविंद देशमुख, संतोष गाजरे पाटील, विश्वंभर तिरूखे, सोपान काका तीरुखे, दत्ता पाटील शिंदे, रमेश शिंदे, कृष्णा पडूळ, गणेश शिंदे, अशोक पडुळ, सुभाष कोळकर, रवीशेठ राऊत, राजू गोरे, शरद देशमुख, माऊली कदम, रोहित देशमुख, शुभम टेकाळे, गजानन महाराज देठे, नारायण गजर, रवी वाढेकर, बालासाहेब इंगळे, गणेश मोहिते, विष्णू घनघाव, बंडू तीरुखे आदींनी केले आहे.