राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि शिंदे सरकारमधील मंत्री छगन भुजबळ हे आज नाशिकमध्ये आहेत. अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानाची ते पाहणी करत आहेत. त्यांच्या या दौऱ्याला नाशिकमधील मराठा समाजाने कडाडून विरोध केला आहे. आज सकाळपासूनच नाशिकच्या येवल्यात मराठा समाजाकडून छगन भुजबळ यांचा निषेध केला जात आहे. मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेत गोमूत्र शिंपडलं आहे. येवल्याच्या सोमठानदेश गावातील ज्या मार्गावरून छगन भुजबळ गेले त्या मार्गावर मराठा आंदोलकांनी गोमूत्र शिंपडलं आहे.
मराठा समाजाचा तीव्र विरोध
अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. पिकांचं नुकसान झालं आहे. अशात मंत्री छगन भुजबळ हे नाशिक जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. या पहाणी दरम्यान छगन भुजबळ यांना मराठा आंदोलकांच्या विरोधाला सामोरं जावं लागलं आहे. मराठा आंदोलकांनी ठिकठिकाणी आंदोलन करत भुजबळांचा निषेध नोंदवला आहे.
छगन भुजबळ यांचा हा पाहणी दौरा संपल्यानंतर ज्या रस्त्यावरून छगन भुजबळ परतले. त्या रस्त्यावर मराठा आंदोलकांनी गोमूत्र शिंपडलं आहे. सोमठानदेश इथं पाहणी दौरा आटोपून मंत्री भुजबळ परतले. तेव्हा त्या रस्त्यावर गोमुत्र शिंपडण्यात आलं. दौरा आटोपून भुजबळ परतीच्या प्रवासाला निघालेले असतांना आंदोलकांनी पुन्हा घोषणाबाजी केली. अर्धनग्न होत आंदोलकांनी काळे शर्ट फिरवत भुजबळांचा निषेध केला. यावेळी छगन भुजबळ गो बॅकच्या घोषणा देण्यात आल्या.
लासलगावातील कोटमगाव रेल्वे पुलाजवळ मराठा समाज आक्रमक झाला आहे. ‘छगन भुजबळ गो बॅक’ च्या पाट्या हातात घेवून मराठा आंदोलक घोषणाबाजी करत आहेत. लासलगाव जवळील कोटमगाव इथं नुकसानग्रस्त पाहणी दौऱ्याआधीच भुजबळांना विरोध करण्यात येत आहे. ‘भुजबळ गो बॅक’ चे पोस्टर रेल्वे पुलाच्या भिंतीला चिकटवले आहेत. रस्त्याचं आणि पाण्याचं काम होत नसल्याने लासलगावमधील ग्रामस्थ संतप्त झालेत. आश्वासनं नकोत तर कामं करा…, असं म्हणत या ग्रामस्थांनी ताफा थांबवून छगन भुजबळांना निवेदन दिलं आहे.