पिंपरी चिंचवड परिसरातील महाळुंगे पोलीस स्टेशन हद्दीत युवकाचा खून झाल्याची धक्कादायक घटना 29 नोव्हेंबरला घडली होती. परिसरातील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या मागे मोकळ्या जागेत अमोल विकास पवार या ट्रक ट्रेलर ड्रायव्हरचा निर्घृण खून करण्यात आला होता. या प्रकरणी महत्वाची अपडेट समोर आली असून ३ मारेकऱ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मृत तरुण अमोल विकास पवार याने पिंपरी चिंचवड शहरातील केएसबी चौकात भारद्वाज ट्रक ट्रेलर सर्विसेस कंपनीचा एक ट्रेलर चोरण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्याचा हाच प्रयत्न त्याच्या मृत्यूचे कारण ठरला. आपले ट्रेलर चोरी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे आरोपींच्या लक्षात आल्यानंतर त्याला पकडून बेदम मारहाण करण्यात आली.
ट्रेलरचा ड्रायव्हर आणि त्याच्या इतर सहकाऱ्यांनी अमोल विकास पवारला त्याच ट्रेलरच्या केबिनमध्ये डांबून मारहाण केली व पुढे महाळूंगे पोलीस स्टेशन हद्दीतील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या मोकळ्या जागेत त्याचा मृतदेह फेकून दिला. या घटनेचा तपास पिंपरी चिंचवड शहर पोलीस करत होते.
पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या गुंडा विरोधी पोलिस पथकाने ४८ तासांच्या आत तीन मारेकऱ्यांना अटक केली आहे. दशरथ उर्फ सोनू जयराम अडसूळ, विष्णू अंगद राऊत आणि बळीराम वसंत जमदाडे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहेत. तसेच ट्रक ट्रेलर चोरी करण्याच्या प्रयत्नातून अमोल विकास पवार याचा खून झाल्याचे प्राथमिक पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.