सर्वांचंच लक्ष लागून असलेल्या ४ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. निवडणूकीत भाजपला घवघवीत यश मिळाले असून ३ राज्यांमध्ये भाजपने सत्ता काबीज केलीय. या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष सुरू असतानाच बुलढाण्यामध्ये भाजपच्या दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, तालुका अध्यक्ष निवडीवरुन बुलढाण्यामध्येभाजपच्याच दोन गटात तुफान राडा झाल्याचे समोर आले आहे. मेहकर तालुका अध्यक्ष निवडीवेळी हा संपूर्ण प्रकार घडला. एकाच तालुक्यासाठी दोन वेगवेगळे तालुकाध्यक्ष निवडल्यावरुन हा वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे.
यावेळी दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने- सामने येत भाजपा विधानसभा संपर्क प्रमुख श्री. प्रकाश गेवई यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला. तसेच भाजप कार्यालयाचीही तोडफोड करण्यात आली. या मारहाणीत चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
यावेळी वयस्कर कार्यकर्त्यांनाही मारहाण करण्यात आली असून दोन्ही गटांकडून पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. प्रल्हाद अन्ना लश्कर व शिव ठाकरेसह 25 इतर लोकांनी प्रकाश गवई व अर्जुन राव वानखेड़े सारंग माळेकर यांच्याकडून हा हल्ला करण्यात आला. या घटनेने परिसरात काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.