शिर्डीहून आळंदीकडे जाणाऱ्या पालखीत कंटेनर घुसल्याची धक्कादायक घटना संगमनेर तालुक्यातील घारगाव शिवारानजीक घटली आहे. या भीषण अपघातात 2 भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून 8 ते 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. नाशिक पुणे महामार्गावर हा अपघात घडला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शिर्डी येथील श्री महंत काशीकानंद महाराज यांची साई पालखी दिंडी देवाची आळंदी येथे जात होती . दरम्यान ट्रक चालकाला डुलकी लागल्याने त्याचा ट्रक वरील ताबा सुटला आणि हा ट्रक या दिंडीमध्ये घुसला. यामुळे तीन वारकरी जागीच ठार झाले तर नऊ वारकरी जखमी झाले आहेत.
घारगाव येथील नांदूर खंदरमाळ फाटा सातवा मैल येथे झालेल्या अपघातातील जखमींना तातडीने मदत करण्याच्या सूचना काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते तथा माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि प्रशासनाला केल्या आहेत. त्यानंतर तातडीने मदत पोहोचवण्यात आली आहे