जालना – रेशीम शेतीमध्ये अडचणी कमी आहेत व इतर पिकांच्या तुलनेत उत्पादन अधिक व चांगले उत्पन्न हमखास आहे. बदलत्या हवामानामध्ये संरक्षित पिक म्हणूनही रेशीम शेती ओळखल्या जाते, त्यामुळे महारेशीम अभियानाच्या कालावधीत म्हणजे 20 डिसेंबरपूर्वी जालना जिल्ह्यातील जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी नोंदणी करून रेशीम शेती सुरू करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले. अंबड तालुक्यातील धाकलगाव येथे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आज महारेशीम अभियान अंतर्गत रेशीम शेतकरी मेळावा व नोंदणी कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ बोलत होते.
कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी दिपक पाटील, धाकलगावचे सरपंच बळीराम शेंडगे, तहसीलदार चंद्रकांत शेळके, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे, रेशीम विकास अधिकारी अजय मोहिते, उपविभागीय कृषी अधिकारी राम रोडगे, अपर तहसीलदार रूतुजा पाटील, तालुका कृषी अधिकारी सचिन गिरी, रेशीम कार्यालयाचे वरीष्ठ क्षेत्र सहायक शरद जगताप, मनरेगा तांत्रिक अधिकारी सुनिल काळे, ग्रामपंचायत धाकलगाव सदस्य, रेशीम रत्न पुरस्कार प्राप्त शेतकरी भाऊसाहेब निवदे, उकृष्ट रेशीम उत्पादक शेतकरी उध्दव मुळे, अर्जुन जायभाय, आण्णासाहेब चांदर व शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ म्हणाले की, जालना जिल्ह्यात रेशीम उद्योगकरीता आवश्यक वातावरण, अंडीपुंज निर्मिती केंद्र, कोष बाजारपेठ, उत्कृष्ट चॉकी केंद्र, रेशीम धागा करणारे युनिट अशा सर्व सुविधा उपलब्ध आहेत. यामध्ये अधिक आवश्यक साधने जसे चॉकी वाहतूक वाहन, निर्जंतुकीकरण युनिट, रेशीम काडी-कचराचे सेंद्रिय खतामध्ये रूपांतर करणारे युनिट याचे शेतकरी गट, उत्पादन कंपनी यांना उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
रेशीम धागा निर्मिती प्रक्रीयाच्या पुढे जाऊन हातमागावर जालना जिल्ह्यात रेशीम कपडा विणकाम सुरू करावयाचे असून याकरीता हातमाग विणकाम प्रशिक्षण केंद्र जालना येथे स्थापित करण्यात येणार आहे, याव्दारे ग्रामीण भागातील महिलांना रोजगार उपलब्ध होईल. हवामान बदलामुळे शेती करताना शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते मात्र रेशीम शेतीमध्ये अवकाळी पाऊस, गारपीट याचा विपरित परिणाम होत नाही, रेशीम कोषांना हमी भाव असून रूपये 300 प्रति किलो पेक्षा दर झाल्यावर प्रति किलो रू. 50/- अनुदान देण्याची तरतूद आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी अर्थिक स्थैर्यासाठी रेशीम शेतीही करावी.
रेशीम विकास अधिकारी अजय मोहिते म्हणाले की, रेशीम उद्योगातून जालना जिल्ह्य़ातील अनेक शेतकरी एक एकर क्षेत्रावर वार्षिक 3 लाखांपेक्षा अधिक ऊत्पादन घेत आहेत. रेशीम शेतीपासून शाश्वत उत्पादन मिळते. मनरेगा अंतर्गत कुशल अनुदानामध्ये चांगली वाढ झाली असून आता प्रति एकर रू. 3.97 लाख अनुदान देण्यात येत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी तुती लागवडीकरीता मोठ्या प्रमाणात नोंदणी करावी.
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे म्हणाले की, शेतकऱ्यांनी एकात्मिक पीक पध्दतीमध्ये तुती लागवडीचा समावेश करून आपले उत्पन्न वाढवावे. त्याचबरोबर मनरेगा अंतर्गत तुती लागवडचे अनुदान देण्याचे अधिकार आता तालुका कृषी अधिकारी यांनाही असल्यामुळे कृषी विभागही तुती लागवड क्षेत्र वाढविण्याचे काम करणार आहे.
उपविभागीय कृषी अधिकारी राम रोडगे यांनी कृषी विभागाकडून पोकरा योजने अंतर्गत अंबड व घनसावंगी तालुक्यात रेशीम उद्योगाचा विकास केला असून आता मनरेगाचे माध्यमातून तुती लागवड विस्तार करू अशी, ग्वाही दिली.
प्रारंभी सन 2014-15 पासून यशस्वी रेशीम उद्योग करणारे वडीकाळ्या येथील शेतकरी उध्दव मुळे यांनी रेशीम उद्योगाचे फायदे व कामकाज या विषयी विस्तृत माहिती दिली. केवळ एक एकर जमीनधारक असलेले डुनगाव येथील शेतकरी अर्जुन जायभाये यांनी एक वर्षात रेशीम कोष विक्रीपासून रुपये तीन लाख उत्पादन मिळविले त्यांनीही आपले अनुभव कथन केले.
रेशीम रत्न पुरस्कार प्राप्त भाऊसाहेब निवदे यांनी रेशीम शेती इतक उत्पन्न दुसऱ्या कोणत्याही पिकापासुन मिळत नाही. मी स्वत: महिना 1.50 लाख रूपये रेशीम शेतीपासुन मिळवत आहे. उत्पन्न वाढीसाठी रेशीम शेतीचा अवलंब करा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी रेशीम शेतकरी उध्दव मुळे, अर्जुन जायभाये, भाऊसाहेब निवदे, आण्णासाहेब चांदर यांचा सत्कार जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी जिल्हाधिकारी यांच्या आवाहनास प्रतिसाद देत धाकालगाव, नालेवाडी, अंतरवाली सराटी, दह्याळा, दुनगाव, दाढेगाव, शहापूर, हसनापूर, आदी गावातील एकूण 153 शेतकऱ्यांनी तुती लागवडकरीता नोंदणी केली. तालुका कृषी अधिकारी श्री. गिरी यांनी आभार मानले. सूत्रसंचलन कृषी सहायक अशोक सवासे यांनी केले.