राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस शेतकरी प्रश्नावर गाजला. पहिल्याच दिवशी विरोधक सत्ताधाऱ्यांविरोधात प्रचंड आक्रमक झाले. विधीमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी ठाण मांडला. संत्री, कापसाच्या बोंडांची माळ गळ्यात घालून सरकारविरोधात घोषणाबाजी केली. अवकाळी पावसामुळं शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं अवसान गेलं आहे. कापूस आणि सोयाबीनला भाव मिळत नाही. शेतकरी पुरता उद्ध्वस्त झाला आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या आहेत. सरकार केवळ पंचनामे करत आहे, अशा शब्दांत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडलं.
आम्हाला घोषणा नको, शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा व्हायला पाहिजेत, अशी मागणीही त्यांनी केली. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. सरकारवर विरोधकांचा हल्लाबोल
विधानसभेचे हिवाळी अधिवेशन आजपासून नागपुरात सुरू झाले. अधिवेशनाच्या कामकाजाआधीच ऐन थंडीत नागपुरातील वातावरण तापलं. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह महाविकास आघाडीच्या आमदारांनी सरकारविरोधात केलेल्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
वडेट्टीवार काय म्हणाले?
बळीराजा अवकाळीने त्रस्त असताना सरकार जाहिराती करण्यात व्यस्त आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर हे सरकार असंवेदनशील आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली. त्यांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवरच जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला.
नाना पटोलेही आक्रमक
अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नाही. गारपीट आणि अवकाळी पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना मदत द्यावी यासाठी काँग्रेसने स्थगन प्रस्ताव दिला होता; पण सरकारनं चर्चेपासून पळ काढला, असा आरोप नाना पटोले यांनी केला. खूप मदत दिली असं सांगून चर्चा टाळणं हा शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळण्यासारखं आहे, असंही पटोले म्हणाले.