भोपाळ – ट्रेनप्रवासादरम्यान विविध लोकं भेटत असतात, काही किस्सेही घडतात. मात्र मध्य प्रदेशमध्ये ट्रेनप्रवासादरम्यानच अशी घटना घडली, जी त्या गाडीतील प्रवाशांना कधीच विसरता येणार नाही. ट्रेनच्या जनरल बोगीतून प्रवास करणाऱ्या एका तरूणाचा थंडीमुळे दुर्दैवी मृत्यू झाला. पण धक्कादायक गोष्ट म्हणजे ट्रेनमधील इतर प्रवाशांना या गोष्टीची कल्पनाच नव्हती. कितीतरी वेळ कोणालाही त्याच्या मृत्यूबद्दल कळलेच नाही. कामयानी एक्स्प्रेसमध्ये हा दुर्दैवी प्रकार घडला.
तेथे एका बोगीत विंडो सीटवर बसून हा तरूण प्रवास करत होता. मूळचा बैतूल येथील रहिवासी असलेला हा तरूण एका सिंगल विंडो सीटवर बसला, मात्र त्याच वेळी थंडीमुळे त्याचा बसल्या -बसल्या त्या जागी मृत्यू झाला, पण त्याच बोगीत शेजारी असलेल्या इतर प्रवाशांना या गोष्टीचा जराही सुगावा लागला नाही. इतर लोकांना, प्रवाशांना वाटलं की तो बसल्या जागीच झोपी गेला आहे.
ट्रेनने सुमारे 303 किलोमीटरचे अंतर कापले आणि तरीही त्या तरुणाचा मृतदेह सीटवरच पडून राहिला. इटारसीहून ट्रेन दमोहला पोहोचली तेव्हा काही प्रवाशांना थोडा संशय आला. कारण त्या तरूणाच्या कानात इअरफोन तर होते, पण त्याची काहीच हालचाल होत नव्हती. ते पाहून इतरांना संशय आला आणि त्यांनी तपासले असता, त्याच्या मृत्यू झाल्याचे लोकांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने रेल्वे कंट्रोल रूमला फोन करून या घटनेची माहिती दिली. त्यानंतर सोमवारी सकाळी 9 च्या सुमारास दमोह स्टेशनवर ट्रेनमधून त्या तरूणाचा मृतदेह उतरवण्यात आला.
मृत युवक बैतूलचा रहिवासी असल्याचे त्याच्या तिकिटावरून समजले. त्याने इटारसी येथून बैतूल येथे जाण्यासाठी ट्रेन पकडली पण घरी पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी त्याची तपासणी केल्यावर त्याला मृत घोषित केले. थंडीमुळे ॲटॅक आल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
यानंतर जीआरपीने त्या तरूणाजवळ सापडलेल्या मोबाईल क्रमांकावर फोन करून त्याच्या कुटुंबीयांना मृत्यूची माहिती दिली. शोकाकुल कुटुंबियांनी कसेबसे दमोह गाठून त्यांच्या मुलाचा मृतदेह ताब्यात घेताल. कुंटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरूण हा एसी कंपनीत कामाला होता आणि त्याच कामाच्या संदर्भात तो छनेरा येथे गेला होता. परत येताना ट्रेनमध्ये असतानाच त्याचे फोनवरून घरच्यांशी बोलणं झालं पण ते अखेरचं ठरलं. मुलगा घरी येण्याची वाट बघणाऱ्या कुटुंबियांवर त्याच्या अक्समात मृत्यू दुःखाचा डोंगर कोसळला.