लोकसभेतून १४१ खासदारांचे निलंबन झाल्यानंतर दिल्लीमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या कारवाईनंतर सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येत केंद्र सरकारविरोधात मोर्चा काढला. यावेळी विरोधकांकडून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. यावेळी बोलताना शरद पवार यांनी मोदी सरकारवर हल्ला चढवत या कारवाईचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला.
“लोकशाहीमध्ये संस्थेला महत्व असते. ज्याचा मान आपण राखतो. संसदेत जे झालं ते देशाच्या इतिहासात याआधी कधीही झालं नाही. १५० खासदारांना संसदेच्या बाहेर बसवण्याचे ऐतिहासिक कार्य संसदेत झाले होते. चार- पाच दिवसांपूर्वी संसदेत घुसखोरी झाली. याच घुसखोरीसंदर्भात प्रश्न विचारले, त्यांना पास कोणी दिले? ते संसदेत कसे आले? यावर चर्चा होणे गरजेचे होते. ज्याची मागणी विरोधकांनी केल्याचे शरद पवार म्हणाले.
“विरोधकांच्या या प्रश्नांचे उत्तर देणे सरकारकडून अपेक्षित होते. मात्र सरकारकडून कोणतेही निवेदन देण्यात आले नाही. याऊलट याची मागणी करणाऱ्या खासदारांचे निलंबन करण्यात आले. यापूर्वी इतिहासात कधीही घडली नाही. असे शरद पवार म्हणाले. तसेच विरोधकांना डावलून राजकारण करायचे आहे. देशाची जनता हे पाहत आहे. याची किंमत सरकारला मोजावी लागेल,” असा इशाराही शरद पवार यांनी दिला.
दरम्यान, विरोधकांच्या या मोर्चामध्ये राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे वंदना चव्हाण आदी नेते यावेळी सहभागी होते. यावेळी बोलताना सुप्रिया सुळेंनीही सरकारवर टीका केली. ही अघोषित आणीबाणी आहे. केंद्र सरकारकडून लोकशाहीची हत्या होत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.