अंगणात खेळत असलेल्या एका चिमुकलीवर अचानक भटक्या कुत्र्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. कुत्रे भुंकत असल्याचं पाहून चिमुकली प्रचंड घाबरली. तिने जीवाच्या आकांताने घराकडे धाव घेतली. मात्र, धावता-धावता ती जमिनीवर कोसळली. या घटनेत चिमुकलीचा जागेवरच मृत्यू झाला. मन सुन्न करणारी ही घटना चंदीगड शहरातील मनीमाजरा परिसरात घडली आहे.
या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. मागील काही महिन्यांपासून चंदीगड शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत पाहायला मिळत आहेत. रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर अचानक भटके कुत्रे हल्ला करीत आहेत. कुत्र्यांच्या हल्ल्यांमध्ये आजवर अनेकजण जखमी झाले आहेत.
यामध्ये लहान मुले, महिला तसेच दुचाकीस्वारांचा समावेश आहे. महिलांना तसेच लहान मुलांना रस्त्यावर एकटं पाहून अचानक भटके कुत्रे हल्ले करीत आहेत. याशिवाय दुचाकीवरून जाणाऱ्या व्यक्तींवर देखील भटके कुत्रे हल्ला करीत आहेत.
या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी, मागणी शहरातील नागरिक करीत आहेत. अशातच बुधवारी दुपारच्या सुमारास मनीमाजरा परिसरात खेळत असलेल्या दुसरीत शिकणाऱ्या एका चिमुकलीवर अचानक भटके कुत्रे धावून आले.
कुत्रे आपल्याकडे येत असल्याचे पाहून चिमुकली प्रचंड घाबरली. घराकडे पळत असताना ती खाली रस्त्यावर पडली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. दरम्यान, कुत्र्यांच्या दहशतीमुळेच घाबरून चिमुकलीचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत असून परिसरात घबराटीचं वातावरण आहे.