कोल्हापूर : लोकनियुक्त सरपंच पदावर निवडून आलेल्या सरपंचाला पदभार स्वीकारायला वर्षपूर्ती झाली. त्याच दिवशी त्यांच्या शेतात भानामती करणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा धक्कादायक प्रकार कोल्हापूर जिल्ह्यातील तळंदगे या गावात समोर आला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील तळंदगे या गावचे लोकनियुक्त सरपंच संदीप पोळ यांच्या निवडून आले. त्यांच्या निवडीला आज एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे. दरम्यान एका बाजूला सरपंच पदाची वर्षपूर्ती होत असताना, दुसऱ्या बाजूला मात्र संदीप पोळ यांच्या शेतात अज्ञातांनी खिळे, टाचण्या, लिंबू, नारळ, गुलाल, कुंकू अशा वस्तू टाकून भानामती आणि करणी करण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे.
सदरची बाब संदीप पोळ यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी स्वतः शेतात जाऊन या सर्व वस्तू एकत्र करत त्याची होळी केली आहे. करणी, जादूटोणा आणि भानामती प्रकाराला आपण घाबरत नसून महाराष्ट्र शासनाने अशा प्रकारांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी २०१३ सालीच कायदा बनवल्याचं संदीप पोळ यांनी सांगितले आहे.