जालना – शहरातील स्काऊट गाईड भवन,रेल्वे स्टेशन रोड येथे साने गुरुजींची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचे जालना तालुकाध्यक्ष पांडुरंग वाजेम्हणाले की, आगामी २०२४ हे वर्ष शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष आहे. तसेच अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला शाखा हेलस या शाखेला तीन दशक पूर्ण झाले आहेत. यानिमित्ताने जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत आगामी २०२४ या वर्षात विविध कार्यक्रम घेण्याचे ठरवले आहे. कार्यक्रमात शिक्षक व प्राध्यापक तसेच विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहनही केले. तसेच संस्काराचे वारकरी महोत्सव समिती गठन करण्यात आली आहे, असेही ते म्हणाले. जिल्हा परिषद प्रशाला मुलांची, जालना येथील माजी मुख्याध्यापक प्रकाश कुंडलकर म्हणाले की, साने गुरुजी कथामालेच्या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांचेही मार्गदर्शन घ्यावे.
कथामालेचे जिल्हा पदाधिकारी पवन जोशी म्हणाले की,साने गुरुजींच्या विचारांची, संस्कारांची आज जगाला नितांत गरज आहे. ‘थोर अश्रू’ ही कथा त्यांनी यावेळी सांगितली. शिक्षिका अख्तरजहा कुरेशी म्हणाल्या की, मी स्वतः साने गुरुजींच्या कथा उर्दू भाषेत भाषांतरित केल्या आहेत. याच कथा मूल्य शिक्षणासाठी शाळेत मुलांना ऐकविते. इतर शाळांनीही कथा मुलांना सांगाव्यात, असे आवाहनही केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पांडुरंग वाजे यांनी केले. संदीप इंगोले यांनी आभार मानले. याप्रसंगी हेमंत कुलकर्णी, केदार पवार, रामदास कुलकर्णी, संतोष देशपांडे, प्रशांत बोधक, के. एल. पवार यांचीही उपस्थिती होती.