२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी दहशतवादी हल्ल्याचा कट सुरक्षा दलांनी उधळून लावला आहे. उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला, बोनियार परिसरात सुरक्षा दलांच्या जवानांनी तीन संशयित दहशतवाद्यांना शस्त्रांसह अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून २ पिस्तूल, २ ग्रेनेड, २ मॅगझिनसह २४ गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. संशयित दहशतवाद्यांकडून या शस्त्रांचा तांदळाच्या पाकिटात लपवून पुरवठा करीत होते.याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडन सुरक्षा दलाला मिळाली होती. यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी मोठ्या शिताफीने संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. सध्या त्यांची कसून चौकशी केली जात आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रजासत्ताक दिनी काश्मीर खोऱ्यात सुरक्षा दलांना लक्ष्य करण्याचे आणि दहशत पसरवण्याचे दोन कट सतर्क सुरक्षा दलांनी उधळून लावले आहेत. दक्षिण काश्मीरच्या पुलवामा येथे रस्त्याच्या कडेला दहशतवाद्यांनी स्फोटक यंत्र (IED) बसवलं होतं.
हा प्रकार एका स्थानिकाच्या लक्षात आला. त्याने तातडीने या घटनेची माहिती सुरक्षा दलाच्या जवानांना दिली. माहिती मिळताच पोलीस आणि लष्कराच्या संयुक्त पथकांनी घटनास्थळी पोहोचून तपास केला. आयईडी असल्याची खात्री झाल्यानंतर बॉम्ब निकामी पथकाने संशयित स्फोटक नष्ट केले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
दुसरीकडे काश्मीरच्या बारामुल्ला, बोनियार परिसरातून काही संशयित लोक तांदळाच्या पोत्यांमधून शस्त्राचा पुरवठा करीत होते. या घटनेची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी तीन संशयितांना ताब्यात घेतलं आहे. या शस्त्राचा ते नेमका कुणाला पुरवठा करीत होते. याचा तपास केला जात आहे.